Vimal Khumar 5 Sixes In TNPL: तामिळनाडू प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील क्वालिफायर २ चा सामना चेपॉक सुपर गिलीज आणि दिंडीगुल ड्रॅगन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात आर अश्विनच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या दिंडीगुल ड्रॅगन्स संघाने दमदार विजयाची नोंद केली. यासह या स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात दिंडीगुल ड्रॅगन्स संघातील युवा फलंदाज विमल खुमारने आपल्या आक्रमक फटकेबाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या सामन्यात त्याने विक्रमी फलंदाजी केली.
विमल खुमारची तुफान फटकेबाजी
दिंडीगुल ड्रॅगन्स संघातील २२ वर्षीय फलंदाज विमल खुमारने अशी कामगिरी केली आहे, जी येणारी कित्येक वर्ष लक्षात ठेवलं जाईल. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने एकाच षटकात ३४ धावा करण्याचा कारनामा केला आहे. या तुफान फटकेबाजीसह त्याने आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं आहे.
या सामन्यात आर अश्विनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाला विजयासाठी १७९ धावा करायच्या होत्या. शेवटच्या ४ चेंडूत या संघाला विजयासाठी ५२ धावा करायच्या होत्या. त्यामुळे दिंडीगुल ड्रॅगन्सचा संघ दबावात होता. त्यावेळी १७ व्या षटकात विमल खुमारने असा काही कारनामा केला, की सामना एकतर्फी दिंडीगुल ड्रॅगन्स संघाच्या बाजूने झुकला. या षटकातील पहिल्या चेंडूवर विमलने चौकार मारला. त्यानंतर पुढील पाचही चेंडू त्याने सीमापार पोहोचवले. यादरम्यान त्याने एकूण ३४ धावा वसूल केल्या. यादरम्यान २६ चेंडूत त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
विमल खुमारची दमदार खेळी
विमल खुमारने या डावात फलंदाजी करताना गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने अवघ्या ३० चेंडूंचा सामना करत ६५ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ गगनचुंबी षटकार आणि ५ चौकार मारले. यासह दिंडीगुल ड्रॅगन्स संघाने दिलेलं आव्हान १८.४ षटकात पूर्ण केलं आणि ४ गडी राखून विजय मिळवला. या दमदार विजयासह दिंडीगुल ड्रॅगन्स संघाने तामिळनाडू प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.