रोमहर्षक लढतीत भारताकडून बलाढय़ जर्मनीचा ५-४ असा पाडाव

टोक्यो : ऑलिम्पिक हॉकीमधील ४१ वर्षांच्या ‘पदकदुष्काळास’ गुरुवारी भारतीय पुरुष हॉकी संघाने ‘कांस्यविराम’ दिला. ऑलिम्पिकमधील आठ सुवर्णपदकांचा इतिहास गाठीशी असलेल्या भारताने रोमहर्षक लढतीत बलाढय़ जर्मनीचा ५-४ असा पाडाव करीत हे यश मिळवले.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारताकडून सिम्रनजीत सिंगने (१७व्या, ३४व्या मिनिटाला) दोन गोल केले, तर हार्दिक सिंग (२७व्या मि.), हरमनप्रीत सिंग (२९व्या मि.) आणि रुपिंदर पाल सिंग (३१व्या मि.) यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. जर्मनीकडून तिमूर ओरूझ (दुसऱ्या मि.), निकोलस वेलीन (२४व्या मि.), बेनेडिक्ट फर्ट (२५व्या मि.) आणि ल्युकास विंडफेडर (४८व्या मि.) यांनी एकेक गोल केले.

हॉकीच्या इतिहासात संस्मरणीय यशाचा अध्याय लिहिताना १-३ अशा दोन गोलच्या पिछाडीनंतर दिमाखदार आगेकूच केली. सामना संपल्याची शिटी वाजताच कर्णधार मनप्रीत सिंग आणि ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांच्यासह संपूर्ण भारतीय संघाने जल्लोष साजरा केला. अनेकांचे डोळे या वेळी पाणावले होते. भारताचे हे १२वे ऑलिम्पिक पदक ठरले. १९६८मध्ये मेक्सिको सिटी आणि १९७२मध्ये म्युनिच येथील ऑलिम्पिकनंतर हे भारताने मिळवलेले तिसरे कांस्यपदक ठरले.

पहिले सत्र : ०-१

२०१६मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावरील जर्मनीच्या संघाला पुनरावृत्ती करण्यात अपयश आले. पहिल्या सत्रात जर्मनीने वर्चस्व गाजवले. दुसऱ्याच मिनिटाला ओरूझने गोल करीत जर्मनीचे खाते उघडले. मग पाचव्या मिनिटाला लाभलेला पेनल्टी कॉर्नर भारताने वाया घालवला.

दुसरे सत्र : ३-३

दुसऱ्या सत्रात भारतीय संघ अधिक नियोजनबद्ध पद्धतीने उतरला. निलकांता शर्माच्या पासवर सिम्रनजीतने रीव्हर्सच्या फटक्याद्वारे भारताला बरोबरी साधून दिली. मात्र भारतीय बचावाने केलेल्या चुकांमुळे जर्मनीला आगेकूच करण्याची संधी मिळाली. दोन मिनिटांच्या फरकाने जर्मनीच्या संघाने दोन गोल करीत आघाडी ३-१पर्यंत नेली. परंतु भारताने हिंमत न हरता तीन मिनिटांत बरोबरी करीत उत्तम पुनरागमन केले. २७व्या मिनिटाला भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीत सिंगचा पहिला प्रयत्न अ‍ॅलेक्झांडर स्टॅडलरने अडवल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात हार्दिकने गोल साकारला. दोन मिनिटांतच भारताला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. या वेळी हरमनप्रीतने कोणतीही चूक केली नाही.

तिसरे सत्र : ५-३

मध्यांतरानंतर भारतीय संघाने जोरदार आक्रमण केले आणि सामन्यात प्रथमच आघाडी घेतली. गोलसमोरील अर्धवर्तुळात मनदीप सिंगला धक्का दिल्याप्रकरणी भारताला एक पेनल्टी स्ट्रोक बहाल करण्यात आला. रुपिंदरने ही संधी योग्य पद्धतीने साधली. तीन मिनिटांनी गरुजत सिंगच्या पासवर सिम्रनजीतने दुसरा गोल करीत भारताची आघाडी ५-३ अशी वाढवली. भारताने ४१व्या मिनिटाला तीन सलग पेनल्टी कॉर्नर मिळवले, परंतु ते सर्व वाया घालवले. दोनच मिनिटांनी जर्मनीला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले; परंतु भारतीय बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले.

चौथे सत्र : ५-४

दोन गोलनी पिछाडीवर पडल्यानंतर चौथ्या सत्रात जर्मनीचा संघ अधिक त्वेषाने उतरत भारतीय बचावावर हल्ले करील अशी अपेक्षा होती, परंतु तसे प्रत्यक्षात घडले नाही. ४८व्या मिनिटाला विंडफेडरने श्रीजेशला चकवून संघाचा चौथा गोल केला. ५१व्या मिनिटाला मनदीप सिंगला आघाडी वाढवण्याची सुवर्णसंधी होती; परंतु ती वाया दवडली. सामना बरोबरीत सोडवण्याच्या निर्धाराने जर्मनीने उत्तरार्धात दडपणाखाली खेळ केला. त्यांचे तिन्ही पेनल्टी कॉर्नरचे प्रयत्न श्रीजेशने हाणून पाडले. सामना संपण्याच्या सहा सेकंद आधी जर्मनीला अखेरचा पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु श्रीजेशच्या भक्कम बचावापुढे तो अपयशी ठरला.

गेल्या तीन वर्षांत केलेली प्रचंड मेहनत आणि त्यागानंतर अखेर हे फळ मिळाले आहे. भारतीय हॉकी संघाच्या यशस्वी वाटचालीत प्रशिक्षक म्हणून योगदान देता आल्याचा आनंद आहे. हे पदक भारतीय हॉकीचे रूप पालटणारे ठरेल.

– ग्रॅहम रीड, भारताचे प्रशिक्षक

सध्या मला काय बोलावे, हेच सुचेनासे झाले आहे. १-३ अशा पिछाडीवर असतानाही जर्मनीसारख्या संघाविरुद्ध सामना जिंकणे अविश्वसनीय आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने देशातील चाहत्यांना दिलेले वचन पाळले. गेल्या १५ महिन्यांचा काळ सर्वाधिक आव्हानात्मक होता. परंतु या दरम्यानच ऑलिम्पिक पदकाच्या दृष्टीने आमची संघबांधणी झाली. हे पदक मी संपूर्ण संघाच्या वतीने भारतातील करोनायोद्धय़ांना समर्पित करतो.

– मनप्रीत सिंग, भारताचा कर्णधार

४१ वर्षे.. अखेर इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऑलिम्पिक पदकावर नाव कोरण्याचा आनंद निराळाच आहे. गेल्या २१ वर्षांपासून या क्षणासाठी मेहनत घेत आहेस. त्यामुळे आता हार मानायची नाही, या शब्दांसह मी स्वत:ला प्रेरित केले आणि अखेरच्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर अडवला. 

– पी. आर. श्रीजेश, भारताचा गोलरक्षक

महिला संघही पुरुषांचा कित्ता गिरवणार?

टोक्यो : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघालासुद्धा पुरुषांप्रमाणेच ऐतिहासिक कांस्यपदकावर नाव कोरण्याची संधी आहे. रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटनशी भारताची गाठ पडणार आहे. राणी रामपालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला उपांत्य फेरीत अर्जेटिनाने २-१ असे पराभूत केले. त्यामुळे महिलांना प्रथमच अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. साखळी फेरीत ब्रिटनने भारताला ४-१ अशी धूळ चारली होती. त्यामुळे आता भारताकडे त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा संघांत चौथे स्थान मिळवले होते. त्यामुळे आता भारत ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करणार का, हे पाहणे रंजक ठरेल.