टोक्यो ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघालासुद्धा पुरुषांप्रमाणेच ऐतिहासिक कांस्यपदकावर नाव कोरण्याची संधी आहे. रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटनविरोधात भारतीय संघ मैदानात उतरलाय. राणी रामपालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला उपांत्य फेरीत अर्जेटिनाने २-१ असे पराभूत केले. त्यामुळे महिलांना प्रथमच अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. साखळी फेरीत ब्रिटनने भारताला ४-१ अशी धूळ चारली होती. त्यामुळे या सामन्यामध्ये भारत त्या पराभवाची परतफेड करुन पदक जिंकतोय का याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी स्पर्धेत भारताने सहा संघांत चौथे स्थान मिळवले होते. त्यामुळे आता भारत ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करणार का हे आजच्या सामन्यातून स्पष्ट होईल.

चौथा क्वार्टर

८:४८ : भारत पराभूत, सामना ३-४ च्या फरकाने जिंकत ब्रिटनने कांस्यपदकावर कोरलं आपलं नाव.

८:३४ : गोल करण्यात भारताला अपयश; गुरजीत कौरला होती हॅट-ट्रीकची संधी

८:३३ : ब्रिटनने रेफरल गमावला, भारताला पेनल्टी कॉर्नर देण्याचा निर्णय कायम

८:२८ : सामन्यात १२ मिनिटं शिल्लक असतानाच भारतीय संघ एका गोलने पिछाडीवर

८:२८ : गोल… ब्रिटनने चौथ्या क्वार्टरमधील तिसऱ्याच मिनिटाला मिळवली आघाडी, ४-३ ने ब्रिटन आघाडीवर.

८:२५ : चौथ्या क्वार्टरचा खेळ सुरु

तिसरा क्वार्टर

८:१८ : तिसऱ्या क्वार्टरचा खेळ संपला; या क्वार्टरमध्ये ब्रिटनने एक गोल करत सामन्यात ३-३ ची बरोबर साधली. आता चौथ्या क्वार्टरमधील म्हणजेच सामन्यातील शेवटची १५ मिनिटं ठरणार निर्णयाक

८:१७ : भारताला पेनल्टी कॉर्नर पण गोल करण्यात अपयश

८:०३ : गोल… ब्रिटनने केली बरोबर; सामना ३-३ च्या बरोबरीत

७: ५९ : ब्रिटनला पेनल्टी… पण भारताने सुरेख बचाव करत गोल रोखला.

७: ५६ : तिसऱ्या क्वार्टरमधील खेळ सुरु; भारतासमोर आघाडी टीकवण्याचं आव्हान

दुसऱ्या क्वार्टर

७: ४५ : दुसऱ्या क्वार्टरचा खेळ संपला. हाफ टाइममध्ये भारताकडे एका गोलची आघाडी. रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या ब्रिटनविरोधातील आघाडी टीकवण्याचं भारतासमोर आव्हान.

७: ४४ : गोल… भारताने नऊ मिनिटांमध्ये तिसरा गोल केला. सामन्यात ३-२ ने आघाडीवर.

७: ३९ : पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये करण्यात भारताला यश, गुरजीत कौरने केला गोल. सामना २-२ च्या बरोबरीत

७: ३८ : सलीमा तीतीने भारतासाठी पेनल्टी कॉर्नर मिळवला.

७: ३५ : गोल… भारताने सामन्यामध्ये पहिला गोल केला. गुरजीत कौरने भारतासाठी हा गोल केला.

७: ३३ : ब्रिटनचा दुसरा गोल, सामन्यातील आघाडी २-० वर नेण्यात यश.

७: ३२ : भारताच्या निशाला ग्रीन कार्ड, मैदानात पुढील २ मिनिटांसाठी भारताच्या दहाच खेळाडू असतील.

७: २९ : भारताला पेनल्टी कॉर्नर मात्र गोल करण्यात अपयश.

७: २६ : राणी रामपलाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला आपला बचाव अधिक सक्षम करण्याची गरज आहे.

७: २४ : एलिना रायरने ब्रिटनसाठी गोल केला.

७: २३ : दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच ब्रिटनने गोल करत १-० ची आघाडी मिळवली आहे.

पहिला क्वार्टर

७: १७ : पहिल्या क्वार्टरमधील १५ मिनिटांच्या खेळानंतर एकाही संघाला गोल करता आला नाही. दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत आहेत.

७: ०२ : सामन्याला सुरुवात