लिव्हरपूल आणि टॉटेनहॅम यांच्यात चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीचा थरार आज मध्यरात्री
माद्रिद : अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत टॉटेनहॅम हॉटस्पर आणि लिव्हरपूल या संघांनी चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. लिव्हरपूलने पाच वेळा चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरले असले तरी त्यांना २००५ पासून एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. टॉटेनहॅमला अद्यापही चॅम्पियन्स करंडकाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्यामुळे शनिवारी मध्यरात्री युरोपमधील सर्वोच्च करंडकासाठी होणाऱ्या सामन्यात विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे लक्ष्य दोन्ही संघांनी ठेवले आहे.
युरोपमधील सर्वोत्तम प्रशिक्षकांमध्ये गणल्या जाणाऱ्या जर्गेन क्लोप यांनी लिव्हरपूलला निडर असा संघ बनवले आहे, तर मॉरिशियो पोचेट्टिनो यांनी टॉटेनहॅमला शूर आणि कोणत्याही क्षणी कामगिरी ढेपाळून न देण्याची शिकवण दिली आहे.
इंग्लिश प्रीमिअर लीगचे एकही विजेतेपद खात्यात नसणाऱ्या टॉटेनहॅमला मात्र यंदा चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरण्याची उत्तम संधी आहे. टॉटेनहॅम संघ युवा अजाक्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत
०-३ने पिछाडीवर पडला होता. मात्र ४५ मिनिटांच्या कालावधीत तीन गोल करत टॉटेनहॅमने आयएक्सला धूळ चारत अंतिम फेरी गाठली होती. लिव्हरपूलही बार्सिलोनाविरुद्ध ०-३ने मागे होता; पण परतीच्या सामन्यात चार गोल करून त्यांनी लिओनेल मेसीच्या बार्सिलोनाला पराभवाचा धक्का देत सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी गाठली आहे.
लिव्हरपूलची मदार ट्रेंट अलेक्झांडर-आरनॉल्ड, हॅरी विंक्स, डेले अली तसेच विर्जिल व्हॅन डिक, अँड्रय़ू रॉबर्टसन यांच्यावर असली तरी त्यांना बचावात सादियो माने आणि झेरडन शाकिरी यांची साथ मिळू शकेल. गुडघ्याच्या दुखापतीतून आपण पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याचे टॉटेनहॅमच्या हॅरी केनने जाहीर केल्यामुळे पोचेट्टिनो यांची चिंता मिटली आहे. हॅरी केनने सुरुवातीपासूनच आक्रमणावर भर दिला तर त्याला रोखणे लिव्हरपूलच्या बचावपटूंना कठीण जाणार आहे.
’ सामन्याची वेळ : शनिवारी मध्यरात्री १२.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : सोनी टेन २, सोनी लिव्ह