Ben Austin Death: क्रिकेट विश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियातील १७ वर्षीय क्रिकेटपटू बेन ऑस्टीनला क्रिकेट खेळत असताना जीव गमवावा लागला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, १७ वर्षीय बेन मंगळवारी आपल्या क्लबच्या मित्रांसोबत नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत होता. फलंदाजी करत असताना त्याने हेल्मेट घातलं होतं. तरीसुद्धा वेगाने येणारा चेंडू त्याच्या डोक्याच्या आणि मानेच्या मध्यभागी जाऊन लागला. चेंडू लागताच त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं. पण बुधवारी त्याचा मृत्यू झाला आहे.

फर्नट्री क्रिकेट क्लबने बेन ऑस्टीनच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे, “आम्ही बेनच्या निधनाने पूर्णपणे दु:खी झालो आहोत. आम्हाला नेहमीच त्याची कमतरता जाणवेल. तो एक चांगला व्यक्ती आणि उत्तम क्रिकेटपटू होता. तो आमच्या संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू होता. आम्हाला भविष्यात त्याच्याकडून खूप जास्त अपेक्षा होत्या.”

क्रिकेटमध्ये मानेला चेंडू लागून फलंदाजाने जीव गमावण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी देखील अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. २०१४ मध्ये फिल ह्यूजचा मृत्यू झाल्याची घटना कुठलाही क्रिकेट चाहता विसरू शकणार नाही. ऑस्ट्रेलियातील शेफील्ड शिल्ड क्रिकेट लीग स्पर्धेदरम्यान फिल ह्यूजच्या मानेला चेंडू लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गोलंदाजाने टाकलेला बाऊंसर चेंडू लागताच तो मैदानावर कोसळला होता. त्याला देखील तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. या घटनेनंतर कन्कशनचा नियम आणखी कडक करण्यात आला होता. आता कुठल्याही फलंदाजाच्या हेल्मेटला चेंडू लागून गेला तरीसुद्धा सामना थांबवला जातो आणि फिजिओ मैदानात येऊन चेकअप करतात. फलंदाज खेळण्याच्या मनस्थितीत असेल, तरच त्याला पुन्हा फलंदाजी करण्याची संधी दिली जाते.

पण बेन ऑस्टीनसोबत जी घटना घडली आहे, त्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. फर्नट्री क्रिकेट क्लबने सांगितलं आहे की, ऑस्टिनला नेहमी एक प्रतिभावान आणि उत्साही युवा खेळाडू म्हणून लक्षात ठेवलं जाईल.