|| अविनाश पाटील

दिलीप खांडवीच्या गावापर्यंत खासगी वाहनेही जात नाहीत, तर बस येण्याचे स्वप्न दूरच. इतर कोणत्याही दुर्गम भागातील आदिवासी पाडय़ाला ज्या समस्यांना बारमाही तोंड द्यावे लागते, त्यापासून त्याचा पाडाही वंचित नाही. घरातही तीच स्थिती. घरातील आणि बाहेरीलही अशा सर्व बिकट परिस्थितीचा चक्रव्यूह भेदत मारलेला सूर दिलीपला राष्ट्रीय स्तरावरील कुमार (१८ वर्षांखालील) खो-खो खेळाडूंसाठी दिल्या जाणाऱ्या अभिमन्यू पुरस्कारापर्यंत घेऊन गेला आहे.

सुरत येथे अलीकडेच झालेल्या कुमार-कुमारी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या महाराष्ट्र संघाचा कर्णधार दिलीपने २३ मिनिटे संरक्षण आणि २१ गडी बाद करण्याची किमया साधली. राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा दिलीपचा प्रवास खो-खो खेळाप्रमाणेच खडतर म्हणावा लागेल. सुरगाणा तालुक्यातील कृष्णनगर हे त्याचे गाव. पाच भाऊ आणि दोन बहिणींमध्ये दिलीप सर्वात लहान. बहिणींचे लग्न झालेले आहे. शेतीवर संपूर्ण कुटुंबाचा चरितार्थ अवलंबून. डोंगराळ भाग आणि पावसाचे प्रमाण अधिक असल्याने शेती पावसाळ्यातच होते. गावापर्यंत बस जात नाही. इतर खासगी वाहनेही जात नसल्याने गावापासून दीड किलोमीटपर्यंत असलेल्या उंबरठाण या गावापर्यंत बस सेवा मिळण्यासाठी पायी जावे लागते.

दिलीप सध्या अलंगुण येथील शहीद भगतसिंग आश्रमशाळेत इयत्ता ११वीत शिकत आहे. या शाळेतच त्याने उत्तम भोये या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खो-खोचे प्राथमिक धडे गिरवले. अल्पावधीतच मैदानावरील आक्रमण आणि संरक्षणातील कौशल्य त्यास इतर सहकाऱ्यांपेक्षा वेगळ्याच उंचीवर घेऊन गेले. नाशिक जिल्हा खो-खो संघटनेकडून पाठबळ मिळाल्याने त्याच्यातील खेळ बहरत गेला. मागील वर्षी छत्तीसगडमधील नारायणपूर येथे झालेल्या १७ वर्षांखालील शालेय राष्ट्रीय स्पर्धेत दिलीपच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने कांस्यपदक मिळवले. डिसेंबरमध्ये भोपाळ येथे झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत तसेच पुण्यात ‘खेलो इंडिया’ अंतर्गत झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विजयात त्याने चमकदार कामगिरी केली.

खो-खोमध्ये ‘सिंगल चेन’ टाकणे सध्या दुर्मीळ झाले आहे. दिलीप मात्र त्यात माहीर आहे. त्यामुळेच त्याचा खेळ इतरांपेक्षा वेगळा ठरतो. अभिमन्यू पुरस्काराने त्याचे नाव राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले असले तरी आदिवासी विकास विभागाकडून किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींकडून त्याच्या कामगिरीची अद्याप कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. दिलीपलाही त्याची खंत आहे. आपल्या लोकांकडून पाठीवर शाबासकीची थाप मिळाल्यावर आपोआपच उत्साह वाढतो, असे त्याचे म्हणणे आहे. राष्ट्रीय स्तरावरील ‘एकलव्य’ पुरस्काराकडे आता दिलीपचे लक्ष आहे.

नाशिकचे किमयागार नाशिक जिल्ह्य़ातील खो-खो खेळाडूला मिळालेला राष्ट्रीय स्तरावरील हा तिसरा पुरस्कार आहे.

स्वप्निल चिकणे

२०१४ : अभिमन्यू पुरस्कार

 चंदू चावरे

२०१७  : भरत पुरस्कार

  दिलीप खांडवी

२०१९  : अभिमन्यू पुरस्कार