८ चेंडूत ८ षटकार, ११ चेंडूत अर्धशतक, अवघ्या तीन तासात त्रिशतक, १००० धावांची आघाडी आणि ७२५ धावांनी प्रचंड विजय- रणजी करंडक स्पर्धेत अचंबित करणारे विक्रम गेल्या काही वर्षात होत आहेत. या खेळाडूंकडे स्पर्धात्मक क्रिकेटचा अनुभव कमी आहे. या संघांविरुद्ध सामना म्हणजे एकतर्फी विजयाची हमी मानली जाते. यातूनच असे विक्रम होत आहेत.

मेघालयच्या आकाश कुमार चौधरीचं नाव दर्दी क्रिकेटचाहत्यांनाही ठाऊक नव्हतं. पण रविवारी सुरतमध्ये ढगाळ वातावरणात आकाशने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक अद्भुत विक्रम रचला. गॅरी सोबर्स, रवी शास्त्री, माईक प्रॉक्टर या मोठ्या खेळाडूंचे विक्रम आकाश कुमारने १० मिनिटात मोडून काढले. आकाशने अरुणाचल प्रदेशच्या लिमार डाबी आणि टीएनआर मोहित यांच्या गोलंदाजीवर सलग ८ चेंडूत ८ षटकार चोपले. देशातल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असं काही करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. अवघ्या ११ चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केलं. हाही एक नवा विक्रमच आहे.

सार्वकालीन महान अष्टपैलू खेळाडू गॅरी सोबर्स यांनी पहिल्यांदा ६ चेंडूत ६ षटकार लगावण्याची किमया काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत केली होती. १७ वर्षांनंतर रवी शास्त्री यांनी बडोद्याच्या तिलक राजविरुद्ध ६ चेंडूत ६ षटकार लगावले. या दोघांच्या तुलनेत आकाश कुमारची खेळी एका अत्यंत अनुनभवी संघाविरुद्ध होती हे लक्षात घ्यावं लागेल. सुरतमधल्या सी.के. पिठावाला मैदानात आकाशने हा अशक्य वाटणारा विक्रम नावावर केला. अरुणाचल प्रदेशने आतापर्यंत ४० सामने खेळले असून, यापैकी ३५ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीनंतर ९ संघांची भर पडली. यापैकी मेघालय संघालाही मोठ्या विजयाची प्रतीक्षा आहे. हे नवीन संघ मोठ्या संघांसाठी खोऱ्याने धावा काढण्याचं आणि विकेट्स पटकावण्याचं कुरण ठरत आहेत. बीसीसीआयचे माजी जनरल मॅनेजर क्रिकेट ऑपरेशन्स साबा करीम यांनी सांगितलं की, रणजी स्पर्धेत ३८ संघ आहेत. खेळाचा स्तर उंचावण्याऐवजी खालावला आहे.

रणजी करंडक स्पर्धेच्या सध्याच्या रचनेत एलिट आणि प्लेट अशी संघांची विभागणी आहे. एलिट गटातल्या तळाच्या दोन संघांची रवानगी प्लेट गटात होते. प्लेट गटात अंतिम लढतीत खेळणारे दोन संघ एलिट गटात आगेकूच करतात. यामुळे नव्या संघांना बलाढ्य संघांविरुद्ध खेळावं लागतं. त्याचवेळी मोठे संघ प्लेट गटात गेल्यानंतर त्यांच्यासाठी अनुनभवी संघ कुरण ठरतं.

२०२२-२३ हंगामात मुंबईने उत्तराखंडविरुद्ध ७२५ धावांनी विजय मिळवला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमधला हा सर्वाधिक फरकाने मिळवलेला विजय आहे.त्याचवर्षी झारखंडने नागालँडसमोर १००९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. अर्थातच झारखंडने मोठा विजय मिळवला.

एलिट गटातून प्लेट गटात रवानगी झाल्यानंतर २०२३-२४ हंगामात हैदराबादने अरुणाचल प्रदेशचा धु्व्वा उडवला. तन्मय अगरवालने १८१ चेंडूतच ३६६ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली होती. त्याने १४७ चेंडूतच त्रिशतक झळकावलं होतं. तन्मयने या खेळीदरम्यान २६ षटकार लगावले.

“नव्या संघांसाठी रणजी स्पर्धेत द्विस्तरीय व्यवस्था असावी. वनडे आणि टी२० प्रकारात नवीन संघ चांगली कामगिरी करत आहेत पण चारदिवसीय लढतीत त्यांचा अनुभव कमी पडतो आहे’, असं करीम यांनी सांगितलं.

‘बीसीसीआय एका हंगामात १००० पेक्षा जास्त सामने आयोजित करतं. त्यामुळे स्पर्धेची संरचना बदलणं सोपं नाही’, असं माजी रणजीपटू शेल्डॉन जॅक्सनने सांगितलं. ‘अलीकडेच नागालँडने तामिळनाडूला थेट विजय मिळवू दिला नाही. हे संघ अगदी अलीकडे खेळू लागले आहेत. १०० वर्षांपेक्षा जास्त परंपरा असणाऱ्या संघांना ते लगेच हरवू शकणार नाहीत. हे समजून घ्यावं लागेल. ८ चेंडूत ८ षटकार कोणालाही मारता येत नाहीत. प्रतिस्पर्धी गोलंदाज नवखा असला तरी फलंदाजांचं कौशल्य नाकारून चालणार नाही. हा विक्रम किती दुर्मीळ आहे याची कल्पना करा. सहज शक्य असता तर प्रत्येक हंगामात हा विक्रम व्हायला हवा होता पण तसं होत नाही’, असं शेल्डॉन म्हणाला.