वृत्तसंस्था, मेलबर्न : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवून ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला सनसनाटी सुरुवात करणारा न्यूझीलंड संघ आता तीच मालिका दुसऱ्या सामन्यातही कायम ठेवण्याच्या इराद्यानेच अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध डेव्हॉन कॉन्वेचा धमाका, जेम्स नीशामची निर्णायक आक्रमकता आणि मिचेल सॅंटनेरचा प्रभावी फिरकी मारा असे तिहेरी वर्चस्व न्यूझीलंडने राखले होते. अष्टपैलू डॅरिल मिचेलदेखील तंदुरुस्त झाल्याने न्यूझीलंडची ताकद अधिक वाढणार आहे. आक्रमकतेचा नवा चेहरा बनू पाहणारा फिन अ‍ॅलनही न्यूझीलंडसाठी तारणहार बनू शकतो.

दुसरीकडे अफगाणिस्ताननेदेखील अलीकडच्या काळात ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये प्रगती केली आहे. रशीद खान, मुजीब उर रेहमान, मोहम्मद नबी यांच्यापाठोपाठ फझलहक  फरुकी आणि नवीन उल हक हे गोलंदाजही चांगल्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे तीनही फिरकी गोलंदाजांना बिग बॅशच्या निमित्ताने ट्वेन्टी-२० क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. फलंदाजांच्या कामगिरीत असलेला सातत्याचा अभाव आणि क्षेत्ररक्षण हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मेलबर्नसारख्या मोठय़ा मैदानावर खेळताना त्यांच्या फलंदाजांची कसोटी लागणार आहे. इब्राहिम झद्रान हा त्यांचा प्रमुख फलंदाज असला, तरी त्याच्याकडे रहमानुल्ला गुरबाज किंवा हजरतुल्ला झझाई यांच्यासारखी ताकद नाही. अर्थात, तंत्र आणि डाव उभारणीसाठी लागणारा संयम ही इब्राहिमची जमेची बाजू असल्याने  इब्राहिमकडून अफगाणिस्तानला मोठय़ा आशा असतील. खेळपट्टी आणि हवामान वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असल्यामुळे गोलंदाजांची निवड आणि नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरू शकतो.

  • वेळ : दु. १.३० वाजता
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १