नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये भारतीय महिला संघाने ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय अशा दोनही मालिका जिंकल्या. या ऐतिहासिक कामगिरीमुळे येत्या काही महिन्यांत होणाऱ्या दोन विश्वचषक स्पर्धांपूर्वी भारतीय महिला संघाचा आत्मविश्वास दुणावला असेल, असे मत दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ट्वेन्टी-२० मालिकेत ३-२ असा विजय नोंदवत इतिहास रचला. इंग्लंडमधील ट्वेन्टी-२० मालिका जिंकण्यात भारतीय महिला संघाला प्रथमच यश आले. पाठोपाठ एकदिवसीय मालिकेतही संघाने २-१ अशी सरशी साधली. महिला संघांची एकदिवसीय मालिका यावर्षी ३० सप्टेंबरपासून सुरू होणार असून भारत आणि श्रीलंका स्पर्धेचे सह-यजमानपद भूषविणार आहेत. त्यानंतर पुढील वर्षी इंग्लंडमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे.

‘‘इंग्लंडमध्ये जिंकणे नेहमीच आव्हानात्मक असते. तेथील परिस्थितीत ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत चमक दाखवल्याने भारतीय संघाची तयारी, तसेच मानसिकता कळते. या कामगिरीमुळे आगामी काळात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी महिला संघाचा आत्मविश्वास दुणावला असेल,’’ असे तेंडुलकर म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताकडून २१ वर्षीय क्रांती गौडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सहा बळी बाद केले. एकदिवसीय सामन्यात पाच बळी मिळवणारी ती सर्वांत कमी वयाची वेगवान गोलंदाज आणि एकूण पाचवी गोलंदाज ठरली. ‘‘पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात स्मृती मनधानाने शतक झळकावत दौऱ्याची उत्तम सुरुवात केली. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात हरमनप्रीतने शतकी खेळी केली. क्रांतीने दडपणाखाली प्रभावी मारा केला आणि सहा बळी मिळवले. अन्य खेळाडूंनीही आपली भूमिका पार पाडली. या मालिकेतील सकारात्मक खेळाचा आगामी काळात भारतीय संघाला फायदा होईल,’’ असेही तेंडुलकरने सांगितले.