Two Australian Women Cricketers Molested In Indore: ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवारी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत इंदूरच्या होळकर स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यापूर्वी दोन ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची दुचाकीवरून आलेल्या एका तरुणाने छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी इंदूरमधील आझाद नगर येथील आरोपी तरुणाला अटक केली आहे. आता या प्रकरणावर बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

बीसीसीआयची प्रतिक्रिया

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी मध्य प्रदेश पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले. ते म्हणाले, “ही एक अतिशय दुर्दैवी घटना आहे. या प्रकारच्या घटनांमुळे बदनामी होते. आरोपीला पकडण्यासाठी तातडीने कारवाई केल्याबद्दल आम्ही मध्य प्रदेश पोलिसांचे कौतुक करतो.”

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला या प्रकरणावर एएनआयशी बोलताना म्हणाले की, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आम्ही याचा निषेध करतो. असे प्रकार टाळण्यासाठी आम्ही आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊ. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.”

काय आहे प्रकरण?

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन महिला संघ रॅडिसन हॉटेलमध्ये थांबला होता. जवळच असलेल्या एका कॅफेत ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला खेळाडू चालत जात होत्या. त्याचदरम्यान, आरोपी दुचाकीवरून तिथे आला आणि दोन्ही महिला क्रिकेटपटूंची छेड काढू लागला. तिथे असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या दुचाकीचा नंबर टिपला आणि दुसऱ्या एका कारचालकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

याचबरोबर ऑस्ट्रेलियन महिला संघाचे सुरक्षा व्यवस्थापक डॅनी सिमन्स यांनीही इंदूरच्या एमआयजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तक्रारीची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

भारत-ऑस्ट्रेलियात उपांत्य फेरीचा सामना

ऑस्ट्रेलियाचा महिला संघ विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यांचा शेवटचा साखळी सामना आज होळकर स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला, ज्यामध्ये त्यांनी विजय मिळवला. या सामन्यातील विजयानंतर ऑस्ट्रेलिया २९ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे भारताविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळणार आहे.