१९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताला कडवी टक्कर दिली. बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशी गोलंदाजांनी हवामानाचा फायदा घेत यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना जोडीला तंगवलं. सक्सेना झटपट माघारी परतल्यानंतर यशस्वी जैस्वालने एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक झळकावलं.

अवश्य वाचा –  U-19 World Cup Final : यशस्वीने ओलांडलं महत्वाचं ‘शिखर’

बांगलादेशी गोलंदाजांचा समर्थपणे सामना करताना, यशस्वी जैस्वालने १२१ चेंडूत ८८ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ८ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या खेळीदरम्यान यशस्वी जैस्वालने, १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे. जैस्वालने यंदाच्या हंगामात सहा सामन्यांत ४०० धावा केल्या.

यादरम्यान यशस्वी जैस्वालने शिखर धवनचा विक्रम मोडीत काढला आहे. १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी आता सर्फराज खानसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानी आलेला आहे.