पाकिस्तानी फलंदाज उमर अकमलने केलेल्या सनसनाटी दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. विश्वचषकादरम्यान आपल्याला बुकींकडून दोन लाख अमेरिकन डॉलरची ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला आहे. सामन्यादरम्यान काही ठराविक चेंडू सोडून देण्यासाठी आपल्याला ही ऑफर देण्यात आल्याचं उमर अकमलचं म्हणणं आहे. याचसोबत बुकींकडून विश्वचषकातला ठराविक सामना न खेळण्यासाठीही उमर अकमलला मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली होती.

पाकिस्तानी वाहिनीवर Sports Action या कार्यक्रमात बोलत असताना उमर अकमलने हा दावा केला आहे. पाकिस्तानी क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढत असलेलं फिक्सींगचं प्रमाण यावर प्रश्न विचारला असताना अकमलने आपल्यालाही बुकींनी ऑफर दिल्याचं सांगितलं. मात्र क्रिकेटशी गद्दारी करणं मला जमणार नसल्याचं सांगत ही ऑफर आपण धुडकावल्याचं उमर अकमलने स्पष्ट केलं. मात्र या प्रकरणाबद्दल अकमलने आयसीसी किंवा पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाकडे तक्रार दाखल केली आहे की नाही याबद्दल स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाहीये.

काही दिवसांपूर्वी अल जझिरा या वृत्तवाहिनीने एका स्टिंग ऑपरेशनद्वारे बेटींगबद्दल मोठा खळबळजनक दावा केला होता. यामध्ये भारत खेळत असलेल्या काही कसोटी सामन्यांमध्येही फिक्सींग झाल्याचा दावा अल जझिराने केला होता. याप्रकरणानंतर आयसीसीने चौकशीला सुरुवात केली होती, मात्र वाहिनीने केलेल्या दाव्यांची पुष्टी करण्यासारखे पुरावे समोर आले नव्हते. त्यामुळे अकमलने केलेल्या दाव्यानंतर आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या प्रकरणी काय पावलं उचलतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.