भारतीय खुली बॅडमिंटन स्पर्धा
* सदोष पंचगिरीमुळे दुसऱ्या फेरीतच पराभूत
* प्रणयचा तौफिक हिदायतला ‘दे धक्का’
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आणि जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या भारताच्या सायना नेहवालला सदोष पंचगिरीचा फटका बसला. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे विजयाची माळ सायनाच्या गळ्यात पडण्याऐवजी जपानच्या युइ हाशीमोटो हिच्या गळ्यात पडली. भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सायनाचे आव्हान २१-१३, १२-२१, २०-२२ असे संपुष्टात आले.
एक तास आणि दोन मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सायना तिसऱ्या गेममध्ये २०-१७ अशी आघाडीवर होती. पण पंचांनी रेषेवर पडलेल्या फटक्याचे गुण सायनाला देण्याऐवजी हाशीमोटोला दिले. हा गुण मिळवून सायना पुढील फेरीत जाणार होती. पण पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे सायना नाराज झाली. हाशीमोटो हिने पुढील पाचही गुण मिळवत हा सामना जिंकला. सायनाला गेल्या वर्षीही या स्पर्धेत कोरियाच्या योऊन जू बे हिच्याकडून दुसऱ्या फेरीत पराभूत व्हावे लागले होते.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाला घरच्या चाहत्यांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत होता. सायनाने अनेक चुका केल्यामुळे हाशीमोटोला सहज गुण मिळत होते. अनेक फटके नेटवर लगावले तरी सायनाने पहिला गेम २१-१३ असा सहज जिंकला. सायनाच्या सुमार फटकेबाजीचा फायदा उठवत हाशीमोटो हिने ११-६ अशी आघाडी घेतली. त्याच जोरावर तिने हा गेम २१-१२ असा जिंकला. निर्णायक गेममध्ये दोघींनीही तोडीस तोड खेळ केला. १६-१६ अशा बरोबरीनंतर सायनाने १८-१७ अशी आघाडी घेतली. २०-१७ अशा स्थितीतून पंचांनी सायनाच्या विरोधात निर्णय दिला. सायनाची खेळातील लय बिघडल्याचा फायदा हाशीमोटोने घेतला आणि सामना जिंकून तिसऱ्या फेरीत मजल मारली. भारताच्या एच. एस. प्रणयने पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीतील माजी अग्रमानांकित तौफिक हिदायतला २६-२४, २१-९ असे सरळ गेममध्ये हरवून खळबळ उडवून दिली. पी. व्ही. सिंधूने चीनच्या यू सनचा १९-२१, २१-१९, २१-१५ असा पाडाव केला.
संग्रहित लेख, दिनांक 26th Apr 2013 रोजी प्रकाशित
सायनाला पंचांनी हरवले!
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आणि जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या भारताच्या सायना नेहवालला सदोष पंचगिरीचा फटका बसला. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे विजयाची माळ सायनाच्या गळ्यात पडण्याऐवजी जपानच्या युइ हाशीमोटो हिच्या गळ्यात पडली.
First published on: 26-04-2013 at 05:27 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Umpire defeted saina nehwal