AUS vs WI T20I Weird Not Out: ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघासाठी कालचा दिवस अत्यंत खास ठरला. भारताच्या वरिष्ठ संघाप्रमाणेच काल युवा संघाला देखील शेवटच्या टप्प्यात येऊन ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध सामन्यात विश्वचषक गमवावा लागला. एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या अंडर १९ संघाचा विश्वचषकातील विजय तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघाने सुद्धा वेस्ट इंडिजविरुद्ध काल सलग दुसरा विजय मिळवला. ग्लेन मॅक्सवेलच्या कारकिर्दीतील विक्रमी पाचव्या शतकाच्या जोरावर (१२०) ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या T20I स्पर्धेत ३४ धावांच्या फरकाने २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. या मोठ्या विजयाच्या सेलिब्रेशनआधीचा एक प्रसंग मात्र चकित करणारा व तितकाच हास्यास्पद ठरला.
बाद तरी नाबाद कारण..
वेस्ट इंडिजच्या आव्हानाचा पाठलाग करण्याच्या शेवटच्या षटकात अल्झारी जोसेफने, स्पेन्सर जॉन्सनचा दुसरा चेंडू कव्हरकडे वळवला. कर्णधार मिचेल मार्शने शांतपणे चेंडू झेलून लगेच गोलंदाजाकडे टाकला. चपळाईने जॉन्सनने जोसेफ क्रिझमध्ये येण्यापूर्वीच त्याला धावबाद केले. अत्यंत स्पष्टपणे जोसेफ बाद झाल्याने मार्श आणि जॉन्सनसह ऑस्ट्रेलियाचा संघ आनंद साजरा करू लागला पण तितक्यात पंचांनी हे सेलिब्रेशन थांबवण्यासाठी मध्यस्थी केली. इथे पंचांनी चक्क जोसेफ नाबाद असल्याचे सांगितले, आणि यासाठी दिलेलं कारण सध्या चर्चेत आलं आहे.
पंचानी जोसेफला नाबाद घोषित करण्याचे कारण सांगितले की, धावबाद केल्यावर ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून अपीलच करण्यात आला नव्हता, त्यामुळे नियमानुसार फलंदाजाला बाद घोषित करता येणार नाही. हे ऐकून ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारासह सगळेच चकित झाले होते. मार्कस स्टॉइनिस आणि जोश हेझलवूड तर हे ऐकून हसायलाच लागले होते. तर टिम डेव्हिडने सुद्धा ‘हा विचित्र प्रकार आहे’ असं म्हणत आश्चर्य व्यक्त केलं.
काय आहे नियम?
MCC कायद्याच्या कलम 31.1 नुसार, पंच अपील केल्याशिवाय फलंदाजाला आऊट देऊ शकत नाहीत. नियम सांगतो की, “कोणत्याही अंपायरने फलंदाजाला थेट बाद घोषित करू नये, जरी तो/ती बाद झाला असेल तरीही, जोपर्यंत क्षेत्ररक्षक अपील करत नाही तोपर्यंत त्याला बाद देता येणार नाही. प्रतिस्पर्धी संघाने विकेटसाठी अपील केलं नसलं तरी नियम कोणत्याही फलंदाजाला स्वेच्छेने मैदान सोडण्यापासून रोखू शकत नाहीत.”
हे ही वाचा<< १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतले किती खेळाडू पुढे वरिष्ठ संघाकडून खेळतात? भारतासह जगभरातल्या देशांची स्थिती काय?
दरम्यान, यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजची लढत रोखण्यात यश मिळवले. यजमानांनी पाहुण्यांना नऊ बाद २०७ धावांवर रोखले होते. या दौऱ्यातील वेस्ट इंडिजचा हा सलग पाचवा पराभव ठरला आहे. या मालिकेतील अंतिम सामना १३ फेब्रुवारी रोजी पर्थ येथे होणार आहे ज्यात ऑस्ट्रेलिया अपराजित राहण्यासाठी प्रयत्न करेल तर वेस्ट इंडिज सांत्वनात्मक विजयासाठी खेळताना दिसेल.