राज्याच्या क्रीडाक्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिवछत्रपती पुरस्काराच्या यादीतून डावलण्यात आल्यामुळे काही निराश झालेले खेळाडू गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. आपल्यावर अन्याय झाल्यामुळे हे खेळाडू आपली कैफियत उपमुख्यमंत्र्यांपुढे मांडणार आहेत.
राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणारी धावपटू ललिता बाबर तसेच जलतरणातील अव्वल खेळाडू गुरुवारी सकाळी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. ‘‘जलतरणामध्ये काही बदल झाले असून हा खेळ स्विमिंग, वॉटरपूल आणि डायव्हिंग या तीन प्रकारात मोडतो. पण राज्य सरकारने शिवछत्रपती पुरस्कारासाठी जलतरण म्हणजे ‘अ‍ॅक्वेटिक’ हाच निकष लावला. जलतरणातील बदललेल्या नियमांमुळे आम्ही न्यायालयात दाद मागितली असून त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. पण राज्य सरकारने त्याआधीच शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा केली. आता आम्ही आमचे म्हणणे अजित पवारांसमोर मांडणार आहोत. गुरुवारी सकाळी आम्ही त्यांच्याकडे वेळ मागितला आहे,’’ असे महाराष्ट्र जलतरण संघटनेकडून सांगण्यात आले.
राष्ट्रीय धावपटू ललिता बाबर म्हणाली, ‘‘गेली दोन वर्षे माझी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी चांगली होत आहे. २०१०च्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत मी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २०१०पासून मी राष्ट्रीय स्पर्धामध्ये पहिल्या तीन जणींमध्ये स्थान मिळवले आहे, तरीही मला पुरस्कारासाठी डावलण्यात आल्यामुळे मी नाराज आहे. माझी तब्येत ठीक नसल्याने मी गुरुवारीच त्यांची भेट घेईन की नाही, याबाबत साशंकता आहे. मला राष्ट्रीय सराव शिबिरासाठी बंगळुरूला रवाना व्हायचे असल्यामुळे माझी भेट कधी होईल, हे सांगणे कठीण आहे.’’ दरम्यान, महाराष्ट्राचा कबड्डीपटू प्रशांत चव्हाणने बुधवारी क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली.