आगामी फुटबॉल विश्वचषकाच्या आयोजनाविरोधात सुरू असलेला विरोधाचा कोणताही परिणाम होऊ न देता ब्राझीलने कॉन्फेडरेशन चषकात उपांत्य फेरीत धडक मारली. आता त्यांच्यासमोर तुल्यबळ उरुग्वेचे आव्हान आहे. १९५० साली तुलनेने अनुनभवी असलेल्या उरुग्वेने मातब्बर ब्राझीलला नमवत विश्वचषकावर कब्जा केला होता. फुटबॉल विश्वातल्या खळबळजनक विजयांपैकी हा एक महत्त्वाचा विजय मानला जातो. आताही उरुग्वेच्या क्षमतेची ब्राझीलला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे त्यांना कमी लेखण्याची चूक ब्राझीलचा संघ करणार नाही.
उरुग्वेने २०११ मध्ये अर्जेटिनात झालेल्या कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. या स्पर्धेत ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. विश्वचषक पात्रता फेरीच्या सामन्यांमध्ये उरुग्वेने चांगली कामगिरी केली, तर कॉन्फेडरेशन चषकाच्या प्राथमिक फेरीत उरुग्वेने नायजेरियाला नमवले, तर नवख्या ताहितीचा धुव्वा
उडवला.
उरुग्वेविरुद्ध आम्हाला सखोल अभ्यास करून मैदानात उतरावे लागेल, असे ब्राझीलचा गोलरक्षक ज्युलिओ सेअरने सांगितले. आक्रमण हे त्यांचे बलस्थान असून मजबूत आक्रमणाच्या जोरावर ते सामन्याचा निकाल फिरवू शकतात, असे सेअरने पुढे सांगितले.
एडिसन कॅव्हिनी, दिएगो फोरलॉन आणि ल्युईस सुरेझ हे जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. ताहितीविरुद्ध या त्रिकुटाला विश्रांती देण्यात आली होती. मात्र ब्राझीलविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीसाठी हे त्रिकूट संघात परतणार आहे.
ब्राझीलने जपान, मेक्सिको आणि इटली यांच्यावर विजय मिळवत दिमाखात उपांत्य फेरी गाठली, तर उरुग्वेचा विश्वविजेत्या स्पेनकडून पराभव झाला. मात्र या पराभवातून सावरत त्यांनी नायजेरिया आणि ताहितीवर विजय मिळवला. ब्राझिलने पाच वेळा, तर उरुग्वेने दोन वेळा विश्वविजेतेपद पटकावले आहे.
विश्वचषक आयोजनाला होणाऱ्या विरोधामुळे ब्राझीलला प्रेक्षकांच्या भक्कम पाठिंब्याऐवजी त्यांच्या हुर्योला सामोरे जावे लागत आहे. कॉन्फेडरेशन चषकापूर्वी चिलीविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यातही ब्राझीलला प्रेक्षकांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. आम्ही शानदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली आहे. चाहते नक्कीच आम्हाला पाठिंबा देतील, असा विश्वास ब्राझीलचा मध्यरक्षक बरनॉर्डने व्यक्त केला.
बादफेरीत प्रवेश करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट आम्ही पार केले आहे. विजयासाठी ब्राझीलला पसंती आहे, परंतु फुटबॉलमध्ये काहीही अशक्य नसते. आमच्यासाठी हा आव्हानात्मक सामना आहे, परंतु सर्वोत्तम खेळ केल्यास आम्ही विजय मिळवू, असा विश्वास उरुग्वेचे प्रशिक्षक ऑस्कर तबारेझ यांनी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jun 2013 रोजी प्रकाशित
कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धा : घमासान मुकाबला
आगामी फुटबॉल विश्वचषकाच्या आयोजनाविरोधात सुरू असलेला विरोधाचा कोणताही परिणाम होऊ न देता ब्राझीलने कॉन्फेडरेशन चषकात उपांत्य फेरीत धडक मारली. आता त्यांच्यासमोर तुल्यबळ उरुग्वेचे आव्हान आहे. १९५० साली तुलनेने अनुनभवी असलेल्या उरुग्वेने मातब्बर ब्राझीलला नमवत विश्वचषकावर कब्जा केला होता.

First published on: 26-06-2013 at 05:25 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uruguay now readies to face brazil at confederation cup