संदीप कदम

चार प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम स्पर्धापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या या वर्षीच्या हंगामाला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. राफेल नदाल सोडल्यास अनेक आघाडीचे खेळाडू या स्पर्धेत नाहीत, तर काहींना सूर गवसलेला नाही. त्यामुळे युवा खेळाडू स्पर्धेवर छाप पाडण्याची दाट शक्यता आहे.

‘‘यंदा अमेरिकन टेनिस स्पर्धेसाठी अमेरिकेला मी जाऊ शकणार नसल्यामुळे मला दु:ख वाटत आहे. मी सकारात्मक पद्धतीने खेळाकडे पाहतो आहे. या स्पर्धेत पुन्हा खेळण्याची संधी मिळेल अशी आशा आहे,’’ असे नोव्हाक जोकोव्हिचने म्हटले आहे. करोना लसीकरण न झालेल्या परदेशी नागरिकांना अमेरिका आणि कॅनडात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे जोकोव्हिचचा खेळ पाहण्याची संधी टेनिस चाहत्यांना या वेळी मिळणार नाही.

काही स्पर्धामध्ये खेळू दिले नाही तरी चालेल; परंतु करोनाची लस घेणार नाही, या भूमिकेवर जोकोव्हिच ठाम आहे. त्यामुळे जोकोव्हिचला ऑस्ट्रेलियन स्पर्धेलाही मुकावे लागले होते. ११ सप्टेंबपर्यंत रंगणाऱ्या वर्षांतील चौथ्या आणि अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत गतविजेत्या डॅनिल मेदवेदेव आणि एमा रॅडुकानू यांचा सहभाग असेल. जोकोव्हिचच्या (२१ ग्रँडस्लॅम जेतेपद) अनुपस्थितीत २२ ग्रँडस्लॅम विजेत्या नदालला आणखी एका जेतेपदाची भर घालण्याची संधी आहे. महिला टेनिसमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक असलेल्या सेरेना विल्यम्सची ही अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा ठरू शकते.

पुरुष एकेरीत जोकोव्हिच नसला तरीही गतविजेत्या मेदवेदेवसमोर अनुभवी नदालचे आव्हान असणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या लेव्हर चषक स्पर्धेच्या माध्यमातून पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेला रॉजर फेडरर आणि टोक्यो ऑलिम्पिक विजेता व जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला अलेक्झांडर झ्वेरेव्हला फ्रेंच टेनिस स्पर्धेत दुखापत झाल्याने या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत.

फेडरर, जोकोव्हिच आणि झ्वेरेव्ह स्पर्धेत नसल्याने स्टेफानोस त्सित्सिपास, स्पेनचा कार्लोस अल्काराझ आणि नॉर्वेचा कॅस्पर रुड यांच्यासारख्या खेळाडूंच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे. स्पर्धेची चार जेतेपदे मिळवणाऱ्या नदालसाठी पुन्हा एकदा जेतेपद मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. नदाल ऑस्ट्रेलियाच्या िरकी हिजीकाटाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. नदालसमोर चौथ्या फेरीत फ्रान्सिस टियाफो किंवा डिएगो श्वाट्र्झमन यापैकी एकाचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे, अग्रमानांकित मेदवेदेवला सुरुवातीच्या टप्प्यात अधिक आव्हानात्मक लढतींचा सामना करावा लागू शकतो. निक किरियॉस आणि फेलिक्स ऑगर-अ‍ॅलिसिमे त्याच्यासमोर आव्हान उपस्थित करतील.

अल्काराझने आपल्या खेळामुळे अव्वल त्रिकुटाचा वारसदार आपणच का होऊ शकतो, हे त्याने अभिमानाने जगाला दाखवून दिले.  इटलीचा यानिक सिन्नेर तसेच सिनिसिनाटी मास्टर्समधील विजेता बोर्ना कोरिच हेदेखील चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असतील. कोरिचने अंतिम सामन्यात अमेरिकन जेतेपदाचा प्रबळ दावेदार असणाऱ्या त्सित्सिपासवर विजय मिळवला होता.

महिला एकेरीत चार ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आणि २३ ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या सेरेना विल्यम्सला या स्पर्धेत थेट प्रवेश देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ४१ वर्षीय सेरेनाने निवृत्तीचा इशारा दिला होता. सहा वेळा स्पर्धेची विजेती सेरेना घरच्या चाहत्यांसमोर चांगल्या कामगिरीचा प्रयत्न करेल. मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी साधण्यापासून एक जेतेपद दूर असणाऱ्या सेरेनाला अजिंक्यपद मिळवायचे झाल्यास सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. तिला प्रथम मॉन्टेनेग्रोच्या डंका कोव्हिनिचला सलामीच्या फेरीत नमवावे लागेल. मग तिची गाठ दुसऱ्या मानांकित अ‍ॅनेट कोंटावेटशी होऊ शकते.

गतविजेती एमा रॅडुकानू सेरेनासमोर आव्हान उपस्थित करू शकते, मात्र तिथपर्यंत पोहोचण्याकरिता तिला चांगला खेळ करावा लागेल. तिची गाठ सुरुवातीलाच फ्रान्सच्या अ‍ॅलिझ कॉर्नेटशी होणार आहे. दरम्यान, जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या इगा श्वीऑनटेकही चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक असेल. पोलंडच्या या खेळाडूने वर्षांची सुरुवात दणक्यात केली. फ्रेंच स्पर्धेत जेतेपद मिळवण्यासह ती ३७ सामने अपराजित राहिली. २१ वर्षीय या खेळाडूचा विजयरथ विम्बल्डन स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत थांबला, त्यानंतर ती पुन्हा चुणूक दाखवण्यासाठी सज्ज असेल.

सिनसिनाटी येथे नुकत्याच झालेल्या वेस्टर्न आणि सदर्न टेनिस स्पर्धेत श्वीऑनटेकला उपउपांत्यपूर्व फेरीत मॅडिसन कीजकडून सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेतही तिच्यासमोर अनेक खेळाडूंचे आव्हान असेल. स्पेनच्या गार्बिन मुगुरुझासह अमेरिकेची जेसिका पेगुलाही आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारी ओन्स जाबेऊर ही विल्यम्स आणि कोंटावेट यांच्यासह एकाच गटात असलेल्याने तिला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. यासह युवा राडुकानू आणि लैला फर्नाडिज यांचा प्रयत्न दिमाखदार खेळ करत लक्ष वेधण्याचा असेल.

sandip.kadam@expressindia.com