न्यूयॉर्क : अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या इगा श्वीऑटेकला सरळ सेटमध्ये नमवत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. पुरुष गटात अग्रमानांकित यानिक सिन्नेर आणि ग्रेट ब्रिटनचा जॅक ड्रॅपर हे उपांत्य फेरीत एकमेकांसमोर असणार आहेत.

पेगुलाने श्वीऑटेकला ६-२, ६-४ असे सरळ सेटमध्ये नमवत प्रथम ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. यापूर्वी पेगुलाला ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात सहा वेळा पराभवाचा सामना करावा लागला. पेगुलाने आपले गेले १५ सामने हार्ड कोर्टवर खेळले आहेत आणि त्यापैकी १४ सामन्यांत तिने विजय नोंदवले. सामन्याच्या सुरुवातीपासून पेगुलाने श्वीऑटेकला कोणतीच संधी दिली नाही. पहिला सेट पेगुलाने जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये श्वीऑटेकने आव्हान उपस्थित केले. मात्र, लयीत असलेल्या पेगुलासमोर तिचा निभाव लागला नाही. उपांत्य सामन्यात पेगुलासमोर चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हाचे आव्हान असणार आहे. मुचोव्हाने २२व्या मानांकित ब्राझीलच्या बीअट्रिज हद्दाद माइयाला ६-१, ६-४ असे नमवत सलग दुसऱ्यांदा अमेरिकन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले.

हेही वाचा >>>Video : “मी आणि विराट…”, अनुष्का शर्माचे पालकत्वावर मोठे वक्तव्य; म्हणाली, “मुलांसमोर तुमच्या चुका मान्य करा”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिन्नेरने माजी विजेत्या डॅनिल मेदवेदेवला चार सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात ६-२, १-६, ६-१, ६-४ असे नमवले. नोव्हाक जोकोविच आणि कार्लोस अल्कराझ यांचे आव्हान लवकर संपुष्टात आल्याने पुरुष एकेरीत सिन्नेर हा एकमेव ग्रँडस्लॅम विजेता शिल्लक आहे. सिन्नेरने जानेवारीत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिले दोन सेट गमावल्यानंतर पुनरागमन करताना पाच सेटमध्ये मेदवेदेवला नमवत जेतेपद मिळवले होते. उपांत्य सामन्यात सिन्नेरने पहिला सेट जिंकत चांगली सुरुवात केली. यानंतर दुसरा सेट जिंकत मेदवेदेवने पुनरागमन केले. मग, तिसऱ्या व चौथ्या सेटमध्ये सिन्नेरने मेदवेदेवला कोणतीच संधी न देता विजय साकारला. अन्य उपांत्यपूर्व सामन्यात ड्रॅपरने दहाव्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनाऊरवर ६-३, ७-५, ६-२ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.