शर्यत सुरू झाल्याचे निशाण म्हणून बंदुकीचा बार उडतो, जमैकाचा वेगपुरुषोत्तम उसेन बोल्ट धावायला सुरुवात करतो, आपली त्याच्यावरची नजर स्थिरावण्यापूर्वीच त्याने अव्वल स्थान आणि सुवर्णपदकावर कब्जा केलेला असतो. धावण्याच्या अचाट कौशल्याने जगभरातल्या चाहत्यांना अवाक करणाऱ्या वेगपुरुषाची धावणे ही कला दुसऱ्या खेळात परावर्तित होणार आहे. अ‍ॅथलेटिक्समधील कारकिर्दीनंतर बोल्ट धावणे ही प्रमुख हालचाल असलेल्या फुटबॉलमध्ये नशीब अजमवणार आहे. इंग्लंडमधील एका क्लबसाठी करारबद्ध होण्याचे त्याचे स्वप्न आहे. हार्पर कोलिन्स प्रकाशित बोल्टच्या ‘फास्टर दॅन लाइटनिंग’ या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. या पुस्तकात बोल्टने भविष्यातील उपक्रमांविषयी लिहिले आहे.
सहा ऑलिम्पिक पदके आणि आठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदके नावावर असणाऱ्या बोल्टची अन्य खेळांतली रुची वाढत चालली आहे. बोल्टला सुरुवातीपासूनच क्रिकेटपटू व्हायचे होते. त्या दृष्टीने त्याने सुरुवातही केली होती. मात्र प्रशिक्षकांच्या सूचनेनुसार त्याने अ‍ॅथलेटिक्सवडे मोर्चा वळवला.