आगामी काळात भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरलेला पाकिस्तानी घोडेस्वार उस्मान खानने आपल्या घोड्याचं ‘आझाद काश्मीर’ हे नाव बदलायला साफ नकार दिलेला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने उस्मानच्या या कृतीवर आक्षेप घेतला असून याविरोधात तक्रार करण्याची तयारीही दर्शवली आहे.
“हा खरंच इतका मोठा मुद्दा नाहीये. माझ्या भावना साफ आहेत. काश्मीरमध्ये भारत सरकारच्या कारवाईविरोधात मी हे नाव ठेवलेलं नाही. एप्रिल २०१९ साली मी घोड्याचं नाव बदललेलं आहे. काश्मीरमध्ये भारत सरकारतर्फे सुरु झालेल्या कारवाईआधीच मी नाव बदललेलं आहे.” उस्मान ‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता. “मी ऑस्ट्रेलियावरुन घोड्याची खरेदी केली होती. खरेदी करताना घोड्याचं मुळ नाव Here to Stay असं होतं. मात्र याचं नाव बदलण्यासाठी मी एक हजार अमेरिकन डॉलरची फी भरुन सर्व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण केलेली आहे. त्यामुळे मी घोड्याचं नाव बदलणार नाही. मी सध्या मला आणि ‘आझाद काश्मीर’ला टोकियोला नेण्यासाठी स्पॉन्सर शोधत आहे.” उस्मानने आपली बाजू स्पष्ट केली.
ऑलिम्पिक नियमावलीनुसार, ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान कोणत्याही प्रकारची राजकीय, धार्मिक कृत्य करण्याला मनाई आहे. भारत-पाकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या काश्मीर वादाच्या पार्श्वभूमीवर पाक घोडेस्वाराने आपल्या घोड्याला आझाद काश्मीर नाव दिल्यामुळे नियमांचा भंग झाल्याची तक्रार भारतीय ऑलिम्पिक संघटना करणार आहे. (पाकिस्तानमध्ये पाकव्याप्त काश्मीरला आझाद काश्मीर असं म्हटलं जातं) “ऑलिम्पिक खेळांमध्ये कोणत्याही प्रकारचं राजकीय कृत्य करणं हे नियमाला धरुन नाही. स्पर्धकांना अशा पद्धतीने चुकीचं वागण्याची मूभा देता कमा नये.” भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. त्यामुळे आगामी काळात भारतीय ऑलिम्पिक संघटना यावर काय पावलं उचलते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
