Vaibhav Suryavanshi Record In T20 Record: रोहामध्ये एशिया कप रायजिंग स्टार्स २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना यूएईविरुद्ध पार पडला. या सामन्यात भारताचा १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीचं रौद्ररूप पाहायला मिळालं. आयपीएल स्पर्धेत आंतरराष्ट्रीय गोलंदाजांची धुलाई करून ३५ शतक झळकावल्यानंतर आता वैभवने भारतीय अ संघासाठी खेळताना आणखी एक वादळी शतकी खेळी केली आहे. वैभवने ४२ चेंडूत १४४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार आणि १५ षटकार मारले. यादरम्यान वैभवच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

टी -२० क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा ठरणारा पहिलाच फलंदाज

वैभव सूर्यवंशीला आयपीएल २०२५ स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या स्पर्धेत त्याने गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अवघ्या ३५ चेंडूत शतकी खेळी केली होती. तेव्हापासून वैभव सूर्यवंशी हे नाव तुफान चर्चेत आहे. आता एशिया कप रायजिंग स्टार्स स्पर्धेत त्याने चौकार षटकारांचा पाऊस पाडत त्याने अवघ्या ३२ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं आहे.

या खेळीसह त्याने भारतासाठी टी -२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याच्या बाबतीत ऋषभ पंतच्या विक्रमाची बरोबरी केली. भारतासाठी टी -२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम हा अभिषेक शर्माच्या नावावर आहे. त्याने अवघ्या २८ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं होतं.

वैभव सूर्यवंशीच्या नावे आता टी – २० क्रिकेटमध्ये २ शतकं झळकावण्याची नोंद आहे. हे दोन्ही शतकं त्याने ३५ पेक्षा कमी चेंडूत झळकावली आहेत. यासह तो ३५ पेक्षा कमी चेंडूत २ शतकं झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. ही तर सुरुवात आहे, येणाऱ्या काही वर्षात आणखी मोठे विक्रम मोडून काढू शकतो.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक १४४ धावांची खेळी केली. तर जितेश शर्माने ८३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या डावात ४ गडी बाद २९७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या यूएई संघाला ७ गडी बाद १४९ धावा करता आल्या. यासह हा सामना १४८ धावांनी आपल्या नावावर केला.