Vaibhav Suryavanshi Broke Another Record: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया अंडर-२९ संघांमध्ये युथ वनडे मालिका खेळवली जात आहे. दुसऱ्या युथ वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ३०० धावांचा डोंगर उभारला आहे. या सामन्यात भारताचा १४ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीने ७० धावांची उत्कृष्ट खेळी केली. वैभवने ६८ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसाठी ही खेळी साकारली. यादरम्यान त्याने षटकारांचा नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.

दुसरा युथ वनडे सामना ब्रिस्बेनमधील इयान हिली ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय अंडर-१९ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाची संघाची सुरुवात फारशी चांगली नव्हती, डावाच्या दुसऱ्या चेंडूवर कर्णधार आयुष म्हात्रेच्या रूपात त्यांनी पहिली विकेट गमावली. त्यानंतर विहान मल्होत्राने वैभव सूर्यवंशीला चांगली साथ दिली आणि सुरुवातीला सावध फलंदाजी केली. पहिल्या १० षटकांत टीम इंडियाने फक्त ३९ धावा केल्या होत्या. यानंतर वैभव सूर्यवंशीने फटकेबाजी करत ५४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

वैभव सूर्यवंशीची ऑस्ट्रेलियात वादळी फटकेबाजी

६ षटकारांच्या या खेळीसह वैभव सूर्यवंशीने युथ एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. त्याने १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या कर्णधार उन्मुक्त चंदला मागे टाकलं, ज्याच्या नावे ३८ षटकार होते आणि वैभवने त्याला मागे टाकत ४१ षटकार आपल्या नावे केले आहेत.

वैभव सूर्यवंशीने विक्रमी ४१ षटकार मारले आहेत. उन्मुक्त चंदने २१ सामन्यांत ३८ षटकार मारले आहेत, तर वैभवने फक्त १० सामन्यांत त्याच्याहून अधिक षटकारांचा विक्रम केला आहे. सूर्यवंशीने आतापर्यंत युथ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५४० धावा केल्या आहेत. त्याच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त धावा, म्हणजेच २६ टक्के धावा, चौकार-षटकारांच्या मदतीने केल्या. भारतीय खेळाडूंमध्ये, वैभव आणि उन्मुक्त चंद यांच्यानंतर, यशस्वी जैस्वाल या यादीत आहे, ज्याने युथ एकदिवसीय सामन्यात ३० षटकार मारले आहेत.

ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विरुद्धच्या पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीचं अर्धशतक हुकलं, पण दुसऱ्या सामन्यात त्याने चांगली खेळी करून अर्धशतक केलं खरं पण थोडक्यात शतक हुकलं. सूर्यवंशीने ६८ चेंडूत ७० धावा केल्या. शतकाच्या दिशेने जात असलेल्या वैभवला ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू आर्यन शर्माने जबरदस्त झेल टिपत माघारी धाडलं.