व्हॅलेन्सिया संघाने आगामी वर्षांसाठी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत स्थान पटकावले आहे, तर दुसरीकडे नाटय़पूर्ण अखेरच्या लढतींमुळे इलिबार आणि अल्मेरिया या दोन्ही संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे. गेल्या आठवडय़ामध्ये बार्सिलोनाने ला लिगा स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली होती. दुसरीकडे घरच्या सामन्यात अटलेटिको माद्रिद संघाने ग्रेनेडाबरोबर गोलविरहित बरोबरी स्वीकारल्यामुळे त्यांनी चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या साखळी फेरीत तिसरे स्थान पटकावले आहे.
व्हॅलेन्सिया संघाने अल्मेरियावर ३-२ असा विजय मिळवत आपले स्थान बळकट केले असले तरी या पराभवामुळे अल्मेरियाची वाटचाल खंडित झाली आहे. दुसरीकडे इलिबार संघाने कोरडोबा संघावर ३-० असा विजय मिळवला असला तरी त्यांना अठराव्या स्थानावर समाधान मानावे लागले असून त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
अखेरच्या सामन्यात व्हॅलेन्सियाने विजय मिळवल्यामुळे त्यांना सेव्हिला संघापुढे जाऊन चौथे स्थान पटकावता आले आहे. व्हॅलेन्सिया आणि अल्मेरिया यांचा सामना चांगला नाटय़पूर्ण झाला. अल्मेरियाकडून टी. पाट्र्रेयने नवव्या मिनिटाला गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर बराच वेळ व्हॅलेन्सियाने जोरदार आक्रमणे लगावली, पण त्यांना अल्मेरियाचा बचाव भेदता येत नव्हता, अखेर सामन्याच्या २८ व्या मिनिटाला एन. ओटामेंडीने गोल करत व्हॅलेन्सियाला सामन्यात १-१ अशी बरोबरी करून दिली. सामन्यात १-१ अशी बरोबरी झाल्यावर अल्मेरियाने आक्रमणावर अधिक भर देत व्हॅलेन्सियाच्या गोलपोस्टवर जोरदार हल्ले केले. यामध्ये सामन्याच्या ३७व्या मिनिटाला एफ. सोरिआनोने गोल करत अल्मेरियाला पुन्हा एकदा २-१ अशी आघाडी मिळवून दिली. पिछाडीवर गेलेला व्हॅलेन्सियाचा संघ शांत बसणारा नक्कीच नव्हता. त्यांनीही जोरदार आक्रमणे लगावली आणि सामन्याच्या ४५ व्या मिनिटाला एस. फेंघोलीने गोल करत संघाला बरोबरी करून दिली.
मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी जोरदार हल्ले करत विजयासाठी प्रयत्नांची शर्थ केली. बराच वेळ दोन्ही संघांचे हल्ले अयशस्वी होत असताना आता हा सामना बरोबरीत सुटेल असे वाटू लागले होते. पण सामन्याच्या ८० व्या मिनिटाला पॅको अलकेसरने निर्णायक गोल करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. हा गोल झाल्यावर व्हॅलेन्सियाने अभेद्य बचाव केला. अल्मेरियाने विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले खरे, पण त्यांना व्हॅलेन्सियाचा बचाव भेदता आला नाही.