वसई : वसई विरार महापालिकेच्या दहाव्या मॅरेथॉन स्पर्धेत भारतीय लष्कराचा मोहित राठोड विजेता ठरला. ४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा मोहितने २ तास १८ मिनिटांत पूर्ण केली. लष्करी क्रीडा संस्थेच्या (एएसआय) अर्जुन प्रधानने दुसरा क्रमांक, तर अनिश थापाने तिसरा क्रमांक पटकावला.
करोनाच्या कालावधीमध्ये दोन वर्षे खंड पडलेली वसई विरार महापालिका मॅरेथॉन स्पर्धा रविवारी वसईत उत्साहात पार पडली. या स्पर्धेत १६ हजारांहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
४२ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन तसेच २१ आणि ११ किलोमीटर अशा विविध गटांत ही स्पर्धा भरविण्यात आली होती. विरारच्या विवा महाविद्यालयाच्या प्रांगणातून पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ झाला. मोहित राठोरने २ तास १८ मिनिटे ८ सेकंद या सर्वोत्तम वेळेत शर्यत पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. यापूर्वी २०१८ मध्ये रशपाल सिंग यांनी केलेला २ तास २२ मिनिटे ४ सेकंदचा विक्रम मोहितने मोडला. अर्जुन प्रधानने मोहितला कडवी झुंज दिली. अर्जुनने २ तास २० मिनिटे १३ सेकंदांत स्पर्धा पूर्ण करून दुसरा क्रमांक पटकावला. अनिश थापाने २ तास २० मिनिटे ५१ सेकंदांत मॅरेथॉन पूर्ण केली.
महिलांच्या अर्धमॅरेथॉन स्पर्धेत दिल्लीच्या उजालाने १ तास १३ मिनिटे ३६ सेकंद अशा वेळेसह यापूर्वीचा २०१७ मध्ये नोंदवलेला १ तास १७ मिनिटे १ सेकंद वेळेचा विक्रम मोडून विजेतेपद पटकाविले. उजालाने स्पर्धा जिंकताना पाटणा मॅरेथॉनची विजेती प्राजक्ता गोडबोलेवर मात केली. दुसऱ्या क्रमांकावरील प्राजक्ताला शर्यत पूर्ण करण्यासाठी १ तास १५ मिनिटे १२ सेकंद इतका वेळ लागला, तसेच तिसऱ्या क्रमांकावरील फुलन पालने १ तास १६ मिनिटे २ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली. पुरुषांची अर्धमॅरेथॉन किरण म्हात्रेने जिंकली. त्याने १ तास ५ मिनिटे २९ सेकंद अशी वेळ नोंदवली. पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनमधील एलिट विजेत्याला ३ लाख रुपये व अर्धमॅरेथॉन विजेत्याला २ लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळाले. पालिका आयुक्त अनिलकुमार पवार, आमदार हितेंद्र ठाकूर या वेळी उपस्थित होते.