Wiaan Mulder Reveals Why He Did Not Break Brian Lara World Record: दक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वे यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटी सामन्यात मोठा विक्रम रचला गेला आहे. झिम्बाब्वेविरूद्ध सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे झिम्बाब्वेविरूद्ध पहिल्या सामन्यात संघाची जबाबदारी केशव महाराजच्या खांद्यावर होती. तर दुसऱ्या सामन्यात वियान मुल्डरला संघाचे कर्णधारपद मिळाले. त्याने कर्णधारपदाच्य या सामन्यात ३६७ धावांंची वादळी खेळी केली. पण यादरम्यान त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी वियान मुल्डरकडे होती पण त्याने डाव घोषित करून सर्वांना आश्चर्यचकित केले. जेव्हा मुल्डरने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव घोषित केला तेव्हा तो ३६७ धावांवर खेळत होता. दक्षिण आफ्रिकेने ६ बाद ६२६ धावा केल्यानंतर पहिला डाव घोषित केला. दिवसाचा खेळ संपल्यानंतर, मुल्डरने खुलासा केला की त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात ४०० धावा करण्याचा ब्रायन लाराचा विक्रम का मोडला नाही?
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, मुल्डरने ब्रायन लाराच्या विक्रमाबद्दल एक मोठा खुलासा केला. तो म्हणाला, “सर्वात आधी विचार आला तो म्हणजे, संघाकडे पुरेशा धावा आहेत आणि आता गोलंदाजी केली पाहिजे. दुसरं म्हणजे ब्रायन लारा हे महान खेळाडू आहेत. त्यांनी ४०१ धावांची इंग्लंडविरूद्ध मोठी कसोटी इतिहासातील सर्वात मोठी खेळी केली. त्यांच्यासारख्या महान खेळाडूच्या नावेच हा विक्रम राहिला पाहिजे.”
मुल्डर पुढे म्हणाला, “मला पुन्हा जर ४०० धावा करण्याची संधी मिळाली जर मला पुन्हा संधी मिळाली तर मी पुन्हा तेच करेन. मी शुक्री कॉनराडशी (द. आफ्रिकेचे प्रशिक्षक) बोललो आणि तेही माझ्या मताशी सहमत होते. ब्रायन लारा हा एक दिग्गज खेळाडू आहे आणि हा विक्रम त्यांच्या नावे राहिला पाहिजे.”
२००४ मध्ये ब्रायन लारा यांनी इंग्लंडविरुद्ध नाबाद ४०० धावा केल्या होत्या. आतापर्यंत कोणीही त्यांचा विक्रम मोडू शकलेलं नाही. ब्रायन लाराचा विक्रम मोडू शकला नसला तरी, मुल्डरने मात्र इतिहास घडवला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसरं सर्वात जलद त्रिशतक झळकावलं आहे. मुल्डरने २९७ चेंडूत आपलं त्रिशतक पूर्ण केलं. मुल्डरने ३३४ चेंडूत ४९ चौकार आणि चार षटकारांसह ३६७ धावांची नाबाद खेळी केली.