Divya Deshmukh And Her Mother Video: जॉर्जियामध्ये झालेल्या महिला बुद्धिबळ स्पर्धेत विजय मिळवताच नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्याच कोनेरू हम्पीला पराभूत करून तिने हे यश मिळवले आहे.
या ऐतिहासिक विजयानंतर हम्पीशी हस्तांदोलन केल्यानंतर दिव्या देशमुखला अश्रू अनावर झाले. त्यानंतर तिने तिच्या आईला कडाडून मिठी मारली. आईला मिठी मारताना दिव्याला तिचे अश्रू आवरता आले नाहीत. दरम्यान, मायलेकींच्या या भावनिक क्षणांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, दिव्याच्या या यशानंतर तिचे देशभरातून कौतुक होत आहे. दिव्या ही महिला एफआयडीई बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय बुद्धिबळपटू ठरली आहे. या जेतेपदासह दिव्याने ग्रँडमास्टरचा किताबही पटकावला आहे. ग्रँडमास्टर किताब पटकावणारी ती चौथी भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, आंतरराष्ट्रीय मास्टर असूनही दिव्या देशमुख अंतिम फेरीत अंडरडॉग होती, कारण तिची प्रतिस्पर्धी हम्पीने डिसेंबर २०२४ मध्ये तिच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला होता. हम्पी अजूनही जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत ५ व्या स्थानावर आहे, तर दिव्या देशमुख १८ व्या स्थानी आहे. १९ वर्षीय दिव्या देशमुखला गेल्या वर्षीच मुलींच्या गटात जागतिक ज्युनियर चॅम्पियन म्हणून गौरवण्यात आले होते.
नागपूरमध्ये जन्मलेल्या दिव्याने २०२४ मध्ये हंगेरीच्या बुडापेस्ट येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताच्या सुवर्णपदक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि या स्पर्धेत तिने वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले होते. बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी ती चौथी भारतीय महिला आहे आणि पहिल्यांदाच अंतिम फेरीत दोन भारतीय खेळाडूंनी एकमेकांचा सामना केला आहे.
महाराष्ट्र सरकार करणार सन्मान
दिव्याच्या या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्याचे कौतुक केले आहे. ते म्हणाले,
“दिव्याने कोनेरू हम्पी यांना पराभूत केले आहे. मी त्यांचेही अभिनंदन करतो. त्या ही चांगल्या खेळाडू आहेत. पण नागपूर आणि महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही निश्चितपणे तिचा सन्मान करू. ज्यांनी भारताचे आणि महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे, अशा खेळाडूंचा योग्य सन्मान झाला पाहिजे. त्यामुळे मी आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांच्याशी चर्चा करून कशा प्रकारे तिचा सन्मान करायचा, हे ठरवू.”