Video of the dispute between Steve Smith and Jonny Bairstow in the third Test: ॲशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले येथील लीड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा अनुभवी स्टीव्ह स्मिथ आणि इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो यांच्यात बाचाबाची झाली. मोईन अलीने बाद केल्यानंतर स्मिथ पॅव्हेलियनमध्ये परतत असताना बेअरस्टो काहीतरी म्हणाला. यावर स्मिथ खूप रागावलेला दिसला आणि त्याने बेअरस्टोला विचारले, तू काय म्हणालास? स्काय स्पोर्ट्स क्रिकेटने त्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
आपला १०० वा कसोटी सामना खेळणारा स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या डावात केवळ दोन धावा करून बाद झाला. त्याला मोईन अलीने बेन डकेटच्या हाती झेलबाद केले. यानंतर बेअरस्टो आणि स्मिथ यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादाचा व्हिडीओ स्काय स्पोर्ट्सने ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये स्मिथ आणि बेअरस्टो यांच्यातील संभाषण ऐकू येत आहे. ज्यामध्ये बेअरस्टो म्हणाला, “स्मूज भेटू.” यावर स्मिथने त्याला रागाने विचारले, “काय म्हणाला मित्रा?” यानंतर बेअरस्टो म्हणाला, “मी म्हणालो चीअर्स, पुन्हा भेटू.”
ऑस्ट्रेलियाकडे दुसरा दिवस अखेर १४२ धावांची आघाडी –
स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन यांच्या रुपाने ऑस्ट्रेलियाने सध्या दुसऱ्या डावात ४ विकेट गमावल्या आहेत. संघाने ४ बाद ११६ धावा केल्या आहेत. त्यांच्याकडे १४२ धावांची आघाडी आहे. ट्रॅव्हिस हेड १८ आणि मिचेल मार्श १७ धावा करून क्रीजवर आहेत. मोईन अलीने २ विकेट्स घेतल्या. याशिवाय स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्सने १-१ विकेट घेतली आहे.
पॅट कमिन्सने ६ विकेट घेतल्या –
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या २६३ धावांना प्रत्युत्तर देताना यजमान संघ २३७ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने १८ षटकांत ९१ धावांत ६ बळी घेतले. त्याने इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने ८० धावांची खेळी खेळली. जेक क्रॉलीने ३३, मार्क वुडने ८ चेंडूत २४ आणि मोईन अलीने २१ धावांचे योगदान दिले. अशा पद्धतीने इंग्लंडने पहिल्या डावात २३७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कमिन्सशिवाय मिचेल स्टार्कने २, मिचेल मार्श आणि टॉड मर्फीने १-१ विकेट घेतली.