भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधल्यानंतर आजपासून दोन संघामध्ये तिसरा सामना सुरू झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दमदार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर स्वस्तात बाद झाला. पण सलामीवीर विल पुकोव्हस्की आणि मार्नस लाबूशेन जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. पहिल्या दिवसाच्या खेळात ऋषभ पंतची खूप चर्चा झाली.

Video: ऋषभ पंतच्या ‘त्या’ कृतीमुळे अश्विनला राग अनावर

अश्विनच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतकडून विल पुकोव्हस्कीचा झेल सुटला. त्यावेळी तो २६ धावांवर खेळत होता. पदार्पणाच्या सामन्यात त्याला जीवनदान मिळाले. त्यानंतर अर्धशतकानजीक असताना पुकोव्हस्कीचा झेल घेण्याची आणखी एक संधी पंतला मिळाली. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर चेंडू उसळून फलंदाजाच्या खांद्याजवळ आला. पुकोव्हस्कीने बॅट फिरवत चेंडू टोलवला पण चेंडू हवेत उंच उडला. चेंडू वर जाताच पंत झेल घेण्यासाठी हवेत झेपावला. उडी मारत त्याने झेल घ्यायचा प्रयत्न केला, पण चेंडू हाताला लागून बाजूला गेला. त्याने पुन्हा चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला.

पाहा व्हिडीओ-

आणखी वाचा- “बेटा, तुमसे ना…..”; ऋषभ पंतच्या खराब कामगिरीनंतर भन्नाट मीम्स व्हायरल

पंतने झेल पकडला असं त्याला वाटलं त्यामुळे त्याने आणि इतर भारतीय खेळाडूंनी जल्लोष केला. पण तिसऱ्या पंचांनी बारकाईने पाहिल्यानंतर चेंडू जमिनीवर आदळून पुन्हा हातात विसावल्याचं दिसलं. त्यामुळे पुकोव्हस्कीला नाबाद ठरवण्यात आलं. त्याने पदार्पणाच्या सामन्यात दमदार अर्धशतक ठोकलं. ११० चेंडूत ४ चौकारांसह ६२ धावा काढून तो माघारी परतला.