भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाची (आयबीएफ) मान्यता रद्द करण्यात आल्यानंतर माजी महासचिव पी. के. मुरलीधरन राजा यांच्या विरोधी गटाने आता कार्यकारिणीवर परतण्यासाठी बाह्य़ा सरसावल्या आहेत. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या विजेंदर सिंगने मुरलीधरन राजा यांच्या गटाला पाठिंबा दर्शवत या गटाच्या अ‍ॅथलिट्स आयोगात सामील होण्यास होकार दर्शवला आहे.
३५ राज्य बॉक्सिंग संघटनांपैकी २३ संघटनांचा पाठिंबा असल्याचा दावा करणारा हा गट आता आंतरराष्ट्रीय बॉक्िंसग संघटनेशी (एआयबीए) वाटाघाटी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. बॉक्सिंगसाठीची नवीन राष्ट्रीय संघटना स्थापन करण्यासाठी या खेळावर आवड असणाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन एआयबीएने केले आहे. ‘‘एआयबीएला कार्यकारिणीवर पारदर्शी आणि विश्वासू लोकांची गरज आहे. आम्ही त्यांची ही गरज पूर्ण करू शकतो. विजेंदरच्या रूपाने आम्ही भारतीय बॉक्सिंगला विश्वासू पर्याय देऊ शकतो,’’ असे या गटाचे समन्वयक राजा यांनी सांगितले.
‘‘बॉक्सिंग खेळाला पुढे नेण्याची क्षमता असल्यामुळे मी या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. भारतीय बॉक्सिंगला संकटातून बाहेर काढण्याची क्षमता या गटात असल्यामुळे मी लगेच राजा यांना आपला होकार कळवला,’’ असे विजेंदरने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijender singh joins murlidharan rajas rebel faction in iabf
First published on: 07-03-2014 at 05:25 IST