आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेता थाळीफेकपटू विकास गौडाने बीजिंग येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे. अमेरिकेतील सॅन डियागो येथे झालेल्या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावत विकास बीजिंग स्पर्धेसाठी पात्र ठरला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील २० अव्वल थाळीफेकपटू सहभागी झालेल्या या स्पर्धेत अमेरिकेच्या खेळाडूने रौप्य, तर नेदरलँड्सच्या खेळाडूने कांस्यपदकाची कमाई केली.
अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी ६५ मी. अंतरापर्यंत थाळीफेक करणे आवश्यक होते. विकासने यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी नोंदवताना ६५.२५ मीटर अंतरावर थाळी फेकली.
‘यंदाच्या वर्षांतील ही माझी केवळ दुसरीच स्पर्धा आहे. त्याद्वारेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरल्याने अन्य स्पर्धामध्ये माझ्यावर दडपण असणार नाही’, असे विकासने सांगितले.
बीजिंग स्पर्धेसाठी तयारी म्हणून विकास आता पाच ते सहा स्पर्धामध्ये सहभागी होणार आहे. वुहान येथे होणारी आशियाई अजिंक्यपद स्पर्धा आणि शांघाय येथे होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेवर विकास आपले लक्ष्य केंद्रित करणार आहे.
काही दिवसांपूर्वी अॅरिझोना येथे झालेल्या मेसा क्लासिक स्पर्धेत विकासने सुवर्णपदकावर नाव कोरले होते. प्रशिक्षणासाठी अमेरिकेत असणाऱ्या विकाससाठी २०१४ वर्ष संस्मरणीय ठरले होते. ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सुवर्णपदक, तर इन्चॉन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते.
‘यंदाचा हंगाम खूप मोठा आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक यामुळे यंदाचे वर्ष महत्त्वाचे आहे’ असे विकासने सांगितले.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत याआधी दोनदा सहभागी झालो आहे. त्या अनुभवाचा निश्चितच उपयोग होईल. देशासाठी पदक जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे, मात्र जागतिक स्पर्धेत स्पर्धा अतिशय तीव्र असते. पदकापर्यंतचा मार्ग खडतर आहे. पण तिथपर्यंत जाण्याचा मला विश्वास आहे.
विकास गौडा
संग्रहित लेख, दिनांक 26th Apr 2015 रोजी प्रकाशित
विकास गौडा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र
आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेता थाळीफेकपटू विकास गौडाने बीजिंग येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे.
First published on: 26-04-2015 at 02:39 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikas gowda qualifies for world athletics championship