व्हॅलेन्सिआवर २-० विजय; सॅम्युअल गार्सिआ, अॅड्रियन लोपेझचे गोल
व्हिलारिअल संघाने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत व्हॅलेन्सिआवर २-० असा विजय मिळवला. या विजयासह युरोपा लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. या विजयासह चॅम्पियन्स लीग पात्रता स्पर्धेत व्हिलारिअलने स्थान पटकावले आहे. युरोपा लीग स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यास व्हिलारिअल संघाला चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या साखळी गटात थेट स्थान मिळू शकते.
सॅम्युअल गार्सिआने १४व्या मिनिटालाच गोल करत व्हिलारिअलचे खाते उघडले. अॅड्रियन लोपेझने ३३व्या मिनिटाला गोल करत व्हिलारिअलला आघाडी मिळवून दिली. या विजयासह व्हिलारिअलने अॅथलेटिक बिलबाओ संघाला गुणतालिकेत मागे टाकत सहा गुणांची आघाडी घेतली आहे. अन्य लढतीत अॅथलेटिक क्लबने सेल्टा डी व्हिगोवर २-१ अशी मात केली. सेल्टातर्फे फॅबिआन ओरलेनाने १३व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. मात्र अॅथलेटिकतर्फे अर्टिझ अॅडय़ूरिझ झुब्लेडिआने ३८व्या मिनिटाला गोल करत बरोबरी केली. मध्यंतरानंतर दोन्ही संघांचा वेग मंदावला. मात्र ७२व्या मिनिटाला रौल गार्सिआने गोल करत अॅथलेटिकला आघाडी मिळवून दिली. उर्वरित वेळेत सेल्टाच्या आघाडीपटूंना रोखत अॅथलेटिकने सरशी साधली.
गेटाफे संघाने डिर्पोटिव्हो ला कारुना संघाला २-० असे नमवले. प्रेडो लिऑन आणि कालरेस विगरय यांनी प्रत्येकी एक गोल केला. इस्पॅनयोल संघाने फेलिपे कैसेडोच्या हेडरच्या बळावर सेव्हिला संघावर १-० असा विजय मिळवला.
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2016 रोजी प्रकाशित
ला लिगा फुटबॉल स्पर्धा : व्हिलारिअलची आगेकूच
व्हिलारिअल संघाने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत व्हॅलेन्सिआवर २-० असा विजय मिळवला.

First published on: 03-05-2016 at 04:54 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Villarreal beat valencia to secure fourth spot in la liga