Virat Kohli Test Retirement 12 Years Old Video Viral: विराट कोहलीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. रोहित शर्मानंतर आता विराटने ही कसोटीमधून निवृत्ती जाहीर करत चाहत्यांना धक्का दिला. विराट कोहलीची कसोटी क्रिकेटच्या मैदानावर तळपणारी बॅट, त्याचं विकेटनंतरचं सेलिब्रेशन, मैदानावरील आक्रमकता नेहमीच आठवत राहणार आहे. पण याशिवाय कोहलीचे विराट विक्रम कायम लक्ष वेधून घेणार असतात. पण विराटचं कसोटी क्रिकेटमधील एक मोठा विक्रम आपल्या नावे करण्याचं स्वप्न पूर्ण न करताच आपल्या कारकीर्दीला पूर्णविराम लावला आहे.
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. विराटच्या निवृत्तीदरम्यान त्याचा १२ वर्षांपूर्वीचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधील एक खास विक्रम आपल्या नावे करण्याचं स्वप्न असल्याचं सांगितलं होतं.
विराट कोहलीने १२३ कसोटी सामन्यांमध्ये ४६.८५ च्या सरासरीने ३० शतकं आणि ३१ अर्धशतकांसह ९२३० धावा केल्या. पण कसोटीत १० हजार धावांचा टप्पा गाठण्याचं विराटचं स्वप्न असल्याचं त्याने सांगितलं होतं. त्याला कसोटीत ही स्वप्नवत कामगिरी पूर्ण करण्याकरता ७७० धावांची गरज होती.
१२ वर्षांपूर्वीच्या मुलाखतीत विराट कोहली म्हणाला होता, “मी रेकॉर्ड्सवर लक्ष ठेवत नाही. मी जेव्हा एखाद्या सामन्यात शतक करतो, त्यानंतर मला कळतं की मी सर्वात जलद १० शतकं करणारा खेळाडू ठरलाय वगैरे वगैरे…. त्यामुळे सामना झाल्यानंतर मला हे सर्व विक्रम कळतात. सामन्याआधी माझं लक्ष अशा गोष्टींवर नसतं, की माझ्याकडे ५ शतकं करण्यासाठी ३ इनिंग बाकी आहेत, मग मी रेकॉर्ड करेन. मी असा विचार करत नाही. माझं लक्ष्य कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करण्यावर आणि हा असा विक्रम आहे जो मला गाठायचाच आहे.”
गेल्या ५ वर्षांमध्ये विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरीत घसरण झालेली पाहायला मिळाली. यामुळेच विराट १० हजार कसोटी धावांचा टप्पा गाठण्यात यशस्वी ठरला. विराटच्या आधी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १० हजार धावा करणारे फक्त सात फलंदाज आहेत. भारतीयांमध्ये आतापर्यंत तीन फलंदाजांनी कसोटीत १० हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर (१५,९२१), राहुल द्रविड (१३,२८८) आणि सुनील गावस्कर (१०,१२२) यांचा समावेश आहे.