भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली कसोटी संघात नसला तरी त्याची चर्चा मात्र प्रत्येकवेळेस होते. विराटने इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी संघातून निवृत्ती घेतली होती. सामन्यातील क्षण, विक्रम या व अशा अनेक मुद्द्यांवरून विराट कोहली आजही चर्चेचा विषय असतो. यादरम्यान इंग्लंडचा खेळाडू हसीब हमीद याने विराट कोहलीबाबत मोठा खुलासा केला आहे.
इंग्लंडचा क्रिकेटपटू हसीब हमीद सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये तो धमाकेदार कामगिरी करत आहे. नॉटिंगहॅमशायर संघाचा कर्णधार असलेल्या हसीबने खुलासा केला आहे की तो चांगली कामगिरी करत आहे पण त्याचं श्रेय विराट कोहलीलाही जातं. हसीब हमीदने एका मुलाखतीत खुलासा केला की विराट कोहलीने त्याला खूप मदत केली आहे. फलंदाजीबद्दल त्याला जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं विराटने दिली.
हसीब अहमदने सांगितलं की विराट कोहलीने मला स्वत:चा फोन नंबर दिला आणि जेव्हा गरज असेल तेव्हा कॉल कर असही तो म्हणाला. विराटने हसीब हमीदला कशी मदत केली याबाबत सांगताना तो म्हणाला, “विराट कोहली नेहमीच खूप मदत केली आहे. जेव्हा जेव्हा मला फलंदाजीबद्दल काही प्रश्न विचारायचा असेल तेव्हा तो मदत करत असे. मी त्याचा खूप आदर करतो. त्याने कठीण काळात मला फार पाठिंबा दिला आहे. विराटने मला त्याचा नंबर दिला आणि सांगितलं तुला काही मदत लागली तर बिनधास्त कॉल कर. यावरूनच तो किती कमालीचा माणूस आहे याचा अंदाज येतो”, असं हमीदने सांगितलं.
हसीब हमीदने २०१६ मध्ये कसोटी पदार्पण केले, पण २०२२ पासून तो इंग्लंड संघाबाहेर आहे. उजव्या हाताच्या या फलंदाजाने १० सामन्यांमध्ये ४३९ धावा केल्या, ज्यामध्ये ४ अर्धशतकांचा समावेश आहे. हमीदची सरासरी फक्त २४.३८ होती आणि म्हणूनच त्याला इंग्लंड संघातून वगळण्यात आले. पण मोठी गोष्ट म्हणजे, जेव्हा तो इंग्लंड संघात आला तेव्हा तो फक्त १९ वर्षांचा होता. आता हा खेळाडू २८ वर्षांचा आहे आणि त्याच्या फलंदाजीतही सुधारणा झाली आहे. त्याने काउंटी चॅम्पियनशिपमध्येही याचा पुरावा दिला आहे.
हसीब हमीद २०२५ च्या काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन वनमध्ये नॉटिंगहॅमशायरचे नेतृत्व करत आहे आणि त्याने ७०.६६ च्या सरासरीने ८४८ धावा केल्या आहेत. हमीदने एक द्विशतक आणि एक शतक झळकावलं आहे. ज्यामध्ये १२१ चौकारांचा समावेश आहे.