India vs New Zealand ICC Cricket World Cup 2023 Match Updates: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली विश्वचषक २०२३ मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. या स्पर्धेत विराट कोहली भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने आतापर्यंत एक शतक आणि दोन अर्धशतकांसह २५९ धावा केल्या आहेत. गेल्या सामन्यात विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. हे त्याचे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील ४८ वे शतक ठरले. आजच्या सामन्यात धरमशाला मैदानावर विराट कोहली एक खास विक्रम आपल्या नावावर करण्याच्या अगदी जवळ आहे.
सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी विराट सज्ज –
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात विराट कोहली नवा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ आहे. विराटने बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय कारकिर्दीतील ४८वे शतक झळकावले होते. आता विराट सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४९ शतकांच्या विक्रमापेक्षा फक्त एक शतक मागे आहे. विराटने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावल्यास त्याच्या नावावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४९ शतके होतील आणि तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४९ शतके करणारा सचिननंतरचा दुसरा खेळाडू ठरेल.
२० वर्षांपासून न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी स्पर्धेत जिंकला होता सामना –
टीम इंडियाला गेल्या २० वर्षांपासून न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी स्पर्धेत सामना जिंकता आलेला नाही. २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने न्यूझीलंडचा शेवटचा पराभव केला होता. त्यावेळी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने ७ विकेटने विजयी मिळवला होता. यानंतर न्यूझीलंडने टी-२० विश्वचषक २००७ आणि टी-२० विश्वचषक २०१६ सह एकदिवसीय विश्वचषक २०१९ च्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१ आणि टी-२० वर्ल्ड कप २०२१ च्या अंतिम फेरीत भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता.
वनडेत न्यूझीलंडविरुद्ध भारताचा वरचष्मा आहे. दोघांमध्ये एकूण ११६ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत भारताने ५८ आणि न्यूझीलंडने ५० सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर ७ सामने अनिर्णित राहिले. एक सामना बरोबरीत राहिला आहे. भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध २९ सामने जिंकले आहेत. जानेवारी २०२३ मध्ये भारत आणि न्यूझीलंड शेवटच्या वनडे मालिकेत आमनेसामने आले होते. भारताने घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडचा व्हाईटवॉश केला होता. या मालिकेत कर्णधार रोहितने शतक झळकावले होते. रोहितचा सलामीचा जोडीदार शुबमन गिलने शतक आणि द्विशतक झळकावले होते.