ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धच्या सुमार कामगिरीनंतर भारताचा कर्णधार विराट कोहली याचे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतील स्थान घसरले आहे.  विराट कोहली या फलंदाजांच्या या क्रमवारीत चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे. यापूर्वीच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर विराटची तिसऱ्या स्थानापर्यंत घसरण झाली होती. तर दुसरीकडे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सने या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. विल्यम्सनने नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कारकीर्दीत त्याच्या कारकीर्दीतील १६ वे शतक झळकावले होते. त्यामुळेच विल्यम्सनने विराट कोहली आणि इंग्लंडच्या जो रूटला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. मात्र, ऑस्ट्रेलियन कर्णधार या स्टीव्ह स्मिथ या क्रमवारीत ९४६ गुणांसह पहिल्या स्थानावर असून केन विल्यम्सन त्याच्यापेक्षा ६७ गुणांनी मागे आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारताने दिमाखदार विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली. पण या मालिकेत विराट कोहलीचे फलंदाजीतील अपयश ही भारतासाठी चिंतेची बाब ठरली आहे. या मालिकेत चार डावांमध्ये विराटला अनुक्रमे ०, १३, १२ आणि १५ म्हणजे दहाच्या सरासरीने फक्त ४० धावा करता आल्या आहेत. विराटची आत्तापर्यंतची ही सर्वात सुमार कामगिरी असून यामुळे विराटचे कसोटीतील सरासरी ५० च्या खाली घसरली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सध्या रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. दोन्ही संघांनी मालिकेत १- १ ने बरोबरी साधली आहे. दुस-या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांची कामगिरी समाधानकारक नव्हती. फिरकी गोलंदाज आर. अश्विन भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. पण भारतीय गोटात चिंतेचा विषय ठरला आहे तो भारताचा कर्णधार विराट कोहलीला अजूनही न गवसलेला सूर. विराटने दोन कसोटीतील चार डावांमध्ये फक्त ४० धावाच केल्या. यापूर्वी विराटने २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अशी सुमार कामगिरी केली होती. विराटने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत १० डावात १३.४०च्या सरासरीने फक्त १३४ धावा केल्या होत्या. कोहलीने कसोटीत ४९.९० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. कर्णधार झाल्यावरही विराटने फलंदाजीतही धडाकेबाज कामगिरी केली होती. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विराटला अजूनही अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहली आत्तापर्यंत सहा कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने ३६ च्या सरासरीने ३२४ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहेत. आता पुढील कसोटीत कोहलीला सूर गवसणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.