टीम इंडियाच्या टी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विराटने आपल्या चाहत्यांना अजून एक धक्का दिला आहे. विराट कोहलीने आयपीएल २०२१ नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रेंचायझीने रविवारी याची माहिती केली. याआधी त्याने टी-२० वर्ल्डकपनंतर भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. आयपीएलच्या या हंगामात आरसीबीची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली आहे. संघाने ७ पैकी ५ सामने जिंकले असून गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आहे.

आरसीबीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली. विराट म्हणाला, ”आज संध्याकाळी मी संघाशी बोललो, की कर्णधार म्हणून ही माझी शेवटची आयपीएल स्पर्धा असेल. मी संघ व्यवस्थापनालाही याबाबत माहिती दिली आहे. हे माझ्या मनात बराच काळ चालले होते. अलीकडेच मी टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. जेणेकरून मी कामाचा ताण व्यवस्थापित करू शकेन.”

 

हेही वाचा – भारतीय क्रिकेटमध्ये अजून एक भूकंप; विराट कोहलीवर लागला ‘मोठा’ आरोप!

विराट म्हणाला, ”गेली काही वर्षे मी खूप क्रिकेट खेळत होतो. मला स्वतःला ताजेतवाने करायचे होते. म्हणूनच मी हा निर्णय घेतला. मी आरसीबी व्यवस्थापनाला हे कळवले आहे की मी संघाशी संबंधित असेल. माझा संघासह ९ वर्षांचा अविस्मरणीय प्रवास आहे. मी या फ्रेंचायझीसाठी खेळत राहीन. सर्व चाहत्यांचे आभार. हा एक छोटासा स्टॉप आहे. हा प्रवास यापुढेही सुरू राहील. आरसीबी एका बदलातून जात आहे. कारण पुढच्या वर्षी आयपीएलचा मोठा लिलाव होणार आहे. मी व्यवस्थापनाला सांगितले आहे, की मी आरसीबी व्यतिरिक्त इतर कोणत्याही संघात असण्याचा विचारही करू शकत नाही.”

विराट लीगच्या पहिल्या हंगामापासून म्हणजेच २००८ पासून आरसीबी संघासोबत आहे. त्याने २०१३ मध्ये संघाचे कर्णधारपद स्वीकारले. त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबीने आजपर्यंत आयपीएलचे जेतेपद पटकावले नाही. त्याने आतापर्यंत १९९ सामने खेळले आहेत आणि ३७.९७च्या सरासरीने ६०७६ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ५ शतके आणि ४० अर्धशतके आहेत.