Virat Kohli New Photo Viral: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा लंडनमधील एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. लंडनमध्ये शाश पटेल नावाच्या इसमाबरोबर विराट कोहली दिसून येत आहे. मात्र त्याच्या फोटोवरून अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. विराट कोहलीचा असा लूक याआधी कुणीही पाहिला नव्हता. त्यामुळे अनेकांना त्याला ओळखणेही कठीण झाल्याचे काहीजण सोशल मीडियावर सांगत आहेत. अवघ्या ३६ वर्षांचे वय असलेल्या विराट कोहलीची दाढी राखाडी झालेली या फोटोत दिसत आहे.
महिन्याभरापूर्वी विराट कोहली शेवटचा सार्वजनिक व्यासपीठावर दिसला होता. १० जुलै रोजी युवराज सिंगने आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये त्याने हजेरी लावली होती. त्यानंतर जवळपास महिन्याभराने आता त्याचा फोटो समोर आला आहे.
युवराज सिंगने आयोजित केलेल्या इव्हेंटमध्ये विराट कोहलीने टेस्टमधून घेतलेल्या निवृत्तीबाबत भाष्य केले होते. तसेच आपल्या दाढीबाबतही तो बोलला होता. विराट म्हणाला की, मी दोन दिवसांपूर्वीच माझ्या दाढीला काळा रंग लावलाय. दर चार दिवसांनी जेव्हा तुम्हाला दाढी रंगवावी लागत असेल, तेव्हा तुम्ही समजून जाता की आता वेळ आली आहे.
विराट कोहलीने स्वतःच्या दाढीवर केलेली टिप्पणी ही खटकली. तर काही जणांना त्यातून तो कसले तरी संकेत देत असल्याचे वाटत आहे.
वनडेतून निवृत्ती घेणार का?
विराट कोहलीचा फोटो सोशल मीडियावर काही जणांनी शेअर केला आहे. त्याखाली त्याचे चाहते विविध कमेंट्स करत आहेत. एका युजरने म्हटले की, विराटला अशा अवतारात पाहून दुःख होत आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, कदाचित एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्त घेणार आहे असे दिसते.
याआधीही पांढरी दाढी चर्चेत
विराट कोहलीच्या दाढीची चर्चा पहिल्यांदाच होत आहे, असे नाही. याआधीही जुलै २०२३ मध्ये विराटने पत्नी अनुष्का शर्माबरोबर शेअर केलेल्या एका फोटोची चर्चा झाली होती. या फोटोत विराटच्या दाढीचे काही केस पिकलेले दिसत होते. धोनीप्रमाणेच कोहलीची दाढी लवकर पिकली, अशी चर्चा त्यावेळी झाली.
२०२२ साली विराट कोहलीने जेव्हा कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता, तेव्हा अनुष्काने लिहिलेली पोस्ट वेधक ठरली होती. अनुष्काने पोस्टमध्ये म्हटले, “मला आठवतंय, एमस धोनी, तू आणि मी एकदा गप्पा मारत असताना तुझ्या राखाडी दाढीवर विनोद केला होता. त्यावर तेव्हा आपण सर्वच हसलो. त्या दिवसानंतर मी तुझ्या दाढीतला फरक बारकाईने टिपत आली आहे. ती अधिकाधिक राखाडी होत गेली.” या प्रसंगातून भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोपे नसल्याचे सुचवायचे आहे. कर्णधार म्हणून कमालीचा तणाव सहन करावा लागतो, ज्याचे परिणाम नंतर वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येतात.