कोलकाता कसोटी सामन्यात भारताने डावाने विजयाच्या दिशेने आगेकूच करायला सुरुवात केली. पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या ६ फलंदाजांना माघारी धाडलं. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस बांगलादेशने ६ गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही बांगलादेशी फलंदाजांची तारांबळ उडाली. मात्र मधल्या फळीत मुश्फिकुर रहिम आणि मोहम्मदुल्लाह यांनी भागीदारी करत भारताचा विजय लांबवला.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात मेहिदी हसन मिराज आणि मुश्फिकूर रहीम हे दोघे खेळत होते. मेहिदी हसन मिराज याच्या फलंदाजीच्या वेळी मोहम्मद शमीने जोरदार चेंडू टाकला. त्याने टाकलेला चेंडू बॅटच्या कडेला लागून उडाला. चेंडू इतक्या वेगाने आला होता की चेंडू थेट षटकार गेला. त्याच्या या फटक्यानंतर चक्क विराट कोहलीदेखील अवाक होऊन पाहू लागला.

पहा व्हिडीओ –

दरम्यान, दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला. विशेषकरुन इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी बांगलादेशची आघाडीची फळी कापून काढली.

त्याआधी, भारतीय संघाने आपला पहिला डाव ९ बाद ३४७ वर घोषित केला. बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांत संपवल्यानंतर भारताने २४१ धावांची आघाडी घेतली. कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करत भारताला आघा़डी मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेताना विराटने १३६ धावांची खेळी केली. त्याला चेतेश्वर पुजारा आणि उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने चांगली साथ दिली. पुजाराने ५५ तर रहाणेने ५१ धावा केल्या.

पहिल्या सत्रापर्यंत भारताने सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली होती. मात्र उपहाराच्या सत्रानंतर विराट कोहली माघारी परतला आणि भारतीय डावाला गळती लागली. एकामोगामाग एक फलंदाज माघारी परतत राहिल्यानंतर अखेरीस कर्णधार विराट कोहलीने ३४७ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. बांगलादेशकडून इबादत हुसेनने ३, अल-अमिन हुसेन आणि अबु जायेदने प्रत्येकी २-२ तर तैजुल इस्लामने १ बळी घेतला.