गेल्या काही काळापासून भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे त्याच्याबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्याकडून उपकर्णधारपदही हिरावून घेतले जाऊ शकते, असे अनेक मीडिया रिपोर्ट्स आले होते. हे सर्व वृत्त फेटाळून लावत विराट कोहलीने अजिंक्यची पाठराखण केली आहे.

मुंबई कसोटीतील विजयानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विराट कोहली अजिंक्य रहाणेबद्दल मोकळेपणाने बोलला. “आम्ही बाहेरील जगातील लोकांकडून केलेल्या मूल्यांकनाच्या आधारे कोणतेही निर्णय घेत नाही. रहाणेला सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. मी अजिंक्यच्या फॉर्मचे मूल्यांकन करू शकत नाही. तसेच इतर कोणीही ते करू शकत नाही. खराब फॉर्ममधून कसे बाहेर पडायचे हे एका खेळाडूला माहित असतं. भूतकाळातील अजिंक्यचे विक्रम लक्षात घेता सध्या त्याला संघात आरामदायी वाटणे सध्या महत्त्वाचे आहे”, असं विराट म्हणाला.

कोहली पुढे म्हणाला, “अशावेळी आपल्याला त्याला साथ देण्याची गरज आहे. त्याने यापूर्वी चांगली कामगिरी केली आहे आणि आपण ते लक्षात ठेवले पाहिजे. आता पुढे काय होईल, असा विचार एखाद्या खेडाळूला करावा लागले, असे वातावरण आम्हाला संघात नको आहे. एक संघ म्हणून आम्ही अशा गोष्टींना परवानगी देत ​​नाही.”

“आम्हा खेळाडूंना संघात काय चालले आहे हे माहीत आहे. बाहेर बरेच काही घडत असते आणि त्याचा आमच्या खेळावर परिणाम होऊ नये, असे आम्हाला वाटते. आम्ही संघातील प्रत्येकाला पाठिंबा देतो मग तो अजिंक्य असो किंवा इतर कोणीही. बाहेर काय चर्चा सुरू आहेत, याच्या आधारे आम्ही निर्णय घेत नाही,” असं विराट कोहली म्हणाला.