क्रिकेटमधून निवृत्तीनंतर सोशल मीडियाच्या मैदानात चौफेर फटकेबाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वीरेंद्र सेहवाग याने गोलंदाज झहीर खान याला साखरपुड्याच्या हटके स्टाईलने शुभेच्छा दिल्या.
अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत साखरपुडा झाल्याची बातमी झहीरने ट्विटर हॅण्डलवरून दिल्यानंतर सर्वांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. झहीरला साखरपुड्याबद्दल शुभेच्छा देताना सेहवागने ”आता घरात हॉकी स्टिक ठेवू नकोस”, असा सल्ला दिला आहे. सेहवागचे ट्विट नेहमी हटके असतात आणि त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते.
झहीरची भावी पत्नी सागरिका हिने अनेक चित्रपटांमध्ये आजवर काम केले असले, तरी ‘चक दे इंडिया’ चित्रपटात तिने साकारलेल्या हॉकीपटूच्या भूमिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. याचाच संदर्भ घेत वीरूने झहीरला सल्ला दिला.
”झहीर तुझे अभिनंदन, हॉकीवर तू क्लीनबोल्ड झालास. पण आता घरात हॉकी स्टिक ठेवू नकोस, तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा.”, असे वीरूने ट्विटमध्ये म्हटले आहे.
Congratulations @ImZaheer ,clean bowled by Hockey, @sagarikavghatge please Hockey nahi dena rakhke.
Wish you both a great life together 🙂 https://t.co/P1JIHce81C— Virender Sehwag (@virendersehwag) April 25, 2017
सागरिका आणि झहीर यांच्या नात्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा रंगली होती. युवराजच्या विवाह सोहळ्यात दोघं एकत्र दिसले होते. त्यानंतर सागरिकानेही झहीरसोबतच्या डेटचे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले नव्हते. अखेर झहीरने सोमवारी सागरिकासोबतचा फोटो ट्विट करून साखरपुडा केल्याचे जाहीर केले.