भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज विराट कोहली सध्या वाईट फॉर्ममध्ये आहे. सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये तर तो धावांसाठी कमालीचा झगडताना दिसला. आयपीएलच्या क्वॉलिफायर २ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली अवघ्या सात धावांवर बाद झाला. महत्त्वाच्या सामन्यात त्याचं अशा प्रकारे बाद होणं संपूर्ण संघासाठी मारक ठरले. राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा सात गडी राखून परावभ केला. या पराभवामुळे बंगळुरूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामात कोहलीने केलेल्या खेळावर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग कमालीचा नाराज झाला आहे. त्याने उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

आयपीएल २०२२ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने बंगळुरूच्या संघाचे कर्णधारपद सोडले होते. कर्णधारपद सोडल्यानंतर तो कुठल्याही दबावाखाली न राहता खेळ करेल, अशी चाहत्यांना आणि क्रिकेट तज्ज्ञांना अपेक्षा होती. मात्र, कोहलीने सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फिरवले आहे. सध्या सुरू असेलेल्या आयपीएलच्या १५व्या हंगामात विराट कोहलीने १६ डावांमध्ये २२.७३च्या सरासरीने अवघ्या ३४१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने केवळ दोन अर्धशतके झळकावली.

‘रनमशीन’ म्हणून प्रसिद्ध असलेला कोहली एक-एक धाव मिळवण्यासाठी झगडताना दिसला. त्याच्या खेळतंत्रावर या गोष्टीचा थेट परिणाम दिसून आला. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात कोहलीच्या तंत्रातील बदल प्रकर्षाने जाणवला. प्रसिद्ध कृष्णाच्या वाइड शॉर्ट चेंडू फटकावण्याच्या नादात कोहली पुन्हा एकदा झेलबाद झाला. ही गोष्ट विरेंद्र सेहवागला सर्वात जास्त खटकली. क्रिकबझसोबतच्या संभाषणात त्याने याबद्दल नाराजी व्यक्त केली. सेहवाग म्हणाला, “जेव्हा फलंदाज फॉर्ममध्ये नसतात तेव्हा ते वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. कदाचित याच कारणामुळे आयपीएलच्या या हंगामात कोहली जवळपास सर्व प्रकारच्या चुका करून बाद झाला. तुम्ही फॉर्ममध्ये असता तेव्हा बॅटच्या मध्यभागी येणारा प्रत्येक चेंडू मारणे हे तुमचे ध्येय असते. चेंडू व्यवस्थित मारण्यात यश येतं तेव्हा तुम्हाला आत्मविश्वास मिळतो. परंतु जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये नसता तेव्हा तुम्ही अगदी खराब चेंडूचाही पाठलाग करण्याचा प्रयत्न करता. कोहलीच्या बाबतीत सध्या असंच झाले आहे.”

पुढे बोलताना सेहवाग असेही म्हणाला, “सध्या जो विराट मैदानात खेळताना दिसत आहे तो आपल्या ओळखीचा विराट कोहली नाहीच. दुसराच कोणीतरी आहे. विराट कोहलीने आयपीएलच्या या हंगामात आपल्या संपूर्ण कारकिर्दीपेक्षाही जास्त चुका केल्या आहेत.”

विरेंद्र सेहवाग व्यतिरिक्त माजी खेळाडू असलेल्या संजय मांजरेकरनेही विराट कोहलीच्या खेळावर टीका केली आहे. एवढेच नाही तर काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक असलेल्या रवी शास्त्रींनीदेखील विराट कोहलीला काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता.