Vishnu Vinod Record: टी-२० क्रिकेटचा क्रेझ हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. युवा खेळाडूंना आयपीएल स्पर्धेतून आपलं कौशल्य जगाला दाखवण्याची संधी मिळते. आता प्रत्येक राज्यातील क्रिकेट असोसिएशनकडून टी-२० लीग स्पर्धेचे आयोजन केले जाऊ लागले आहे. त्यामुळे लोकल क्रिकेटपटूंना राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधित्व करत असलेल्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते. अलीकडेच केरळ प्रीमियर लीग स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत संजू सॅमसन मुख्य आकर्षण आहे. पण आणखी एका फलंदाजाने तुफानी फटकेबाजी करून सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
केरळ प्रीमियर लीग स्पर्धेत धावांचा पाऊस पाडत असलेला विष्णू विनोद हा या स्पर्धेतील दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. या स्पर्धेतील २ सामन्यांमध्ये त्याने १८ चेंडू मैदानाबाहेर पाठवले आहेत. या दमदार फलंदाजीसह त्याने अवघ्या २ सामन्यांमध्ये या स्पर्धेतील ३ मोठे विक्रम मोडून काढले आहेत.
केरळ प्रीमियर लीग स्पर्धेत तो एरीज कोलम सेलर्स संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. या संघाकडून डावाची सुरूवात करताना त्याने त्रिसुर टायटन्स संघाविरूद्ध खेळताना ३८ चेंडूत दमदार फलंदाजी केली. त्याने २२६.३२ च्या स्ट्राईक रेटने ८ षटकारांच्या साहाय्याने ८६ धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने आपल्या संघाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.
पहिल्या सामन्यात तुफानी खेळी केल्यानंतर त्याने संजू सॅमसनच्या कोच्ची ब्लू टायगर्स संघाविरूद्ध खेळताना धावांचा पाऊस पाडला. या सामन्यात त्याने २२९.२७ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ४१ चेंडूत ९४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १० षटकार मारले होते. धावफलकावर २३६ धावा असतानाही या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
हे ३ विक्रम मोडून काढले
सलग २ दिवस २ सामने खेळताना त्याने केरळ प्रीमियर लीग स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यासह सर्वाधिक धावा (१८१ धावा) करण्याचा विक्रम देखील विष्णूच्या नावे आहे. या स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकं झळकाणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत २ अर्धशतकं झळकावली आहेत.