ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने पाकिस्तानचा माजी खेळाडू सलीम मलिकवर आपल्याला लाच दिल्याचा आरोप केला आहे. शेन वॉर्नचं ‘No Spin’ हे आत्मचरित्र वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी शेन वॉर्न सध्या प्रसारमाध्यमांना मुलाखती देतो आहे. NDTV वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेन वॉर्नने हा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

सलीम मलिकने मला कराची सामन्यामध्ये 2 लाख अमेरिकन डॉलरची लाच देण्याचा प्रयत्न केला होता. मी ऑफ स्टम्पच्या बाहेर गोलंदाजी केली तर सामना अनिर्णित राखण्यास मदत होईल, अशी ऑफर सलीम मलिकने आपल्याला दिल्याचं शेन वॉर्नने म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या 1994-95 सालच्या पाकिस्तान दौऱ्यात कराची कसोटी सामन्यातमध्ये लाच प्रकरणाने क्रिकेट विश्वात गदारोळ माजवला होता. यानंतर शेन वॉर्नने दिलेल्या मुलाखतीमुळे हा वाद पुन्हा एकदा डोकं वर काढण्याची चिन्ह दिसतं आहेत.

मलिकवर फिक्सिंगच्या आरोपाची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही माक्र वॉ आणि टीम मे यांनी 1995 साली मलिकने सामना हरण्यासाठी ऑफर दिल्याचा दावा केला होता. पाकिस्तानमधील बुकी सलिम पर्वेझनेही पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सामना फिक्स करण्यासाठी मलिकने 42.5 लाख दिल्याचे पाकिस्तानच्या न्यायालयासमोर कबुल केले होते.