Ollie Pope Wicket: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ३५८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडने देखील दमदार सुरूवात केली आहे. इंग्लंडकडून फलंदाजी करताना टॉप ४ फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ओली ओपने दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याला वॉशिंग्टन सुंदरने बाद करत माघारी धाडलं.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव ३५८ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडकडून जॅक क्रॉली आणि बेन डकेटने दमदार सुरूवात केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १६६ धावा जोडल्या. जॅक क्रॉलीने ८४ धावा केल्या. तर बेन डकेटला आपलं शतक पूर्ण करण्याची संधी होती. पण तो ९४ धावा करत माघारी परतला. दमदार सुरूवात मिळाल्यानंतर पुढे ओली पोप आणि जो रूटने मिळून इंग्लंडला डाव पुढे नेण्यात मोलाची भूमिका बजावली. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी १४४ धावा जोडल्या. त्याने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मात्र, वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर त्याची बत्ती गुल झाली.
तर झाले असे की, भारतीय संघाकडून ७७ वे षटक टाकण्यासाठी वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीला आला. या षटकातील पहिलाच चेंडू त्याने ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकला. जो टप्पा पडताच बाहेरच्या दिशेने गेला. ओली पोपने या चेंडूवर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कडा घेत, स्लिपमध्ये असलेल्या केएल राहुलच्या हातात गेला. राहुलने कुठलीही चूक न करता सोपा झेल घेतला. या भन्नाट झेलमुळे पोपचा डाव ७१ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाला ज्या ब्रेक थ्रुची गरज होती, तो ब्रेक थ्रु मिळाला.
जो रूटची विक्रमी खेळी
इंग्लंडकडून जो रूट खंबीरपणे उभा आहे. या डावात फलंदाजी करताना त्याने १७८ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं आहे. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या चौथ्या स्थानी पोहोचला आहे. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ३८ वे शतक ठरले आहे. यासह सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या विक्रमात त्याने कुमार संगकाराची बरोबरी केली आहे. संगकाराने देखील ३८ शतकं झळकावली आहेत.