Washington Sundar: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिला डाव बरोबरीत राहिला. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांवर संपुष्टात आणला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा डाव देखील ३८७ धावांवर आटोपला. त्यामुळे दुसरा डाव हा शून्यापासून सुरू होणार होता. दुसऱ्या डावात भारताचे गोलंदाज इंग्लंडवर भारी पडले. भारताकडून गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदरने अतिशय सुंदर गोलंदाजी केली.
वॉशिंग्टन सुंदरची ड्रीम स्पेल
या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा शेवट हा एखाद्या चित्रपटाच्या सीनपेक्षा कमी नव्हता. भारताचा डाव संपल्यानंतर दोन षटकांचा खेळ होणार होता. पण, जॅक क्रॉलीने वेळ वाया घालवल्यामुळे केवळ एक षटकाचा खेळ झाला. याचे पडसाद चौथ्या दिवशी पडणार हे सर्वांनाच माहीत होतं आणि झालंही तसंच. भारताची वेगवान गोलंदाजांची तोफ चौथ्या दिवशी चांगलीच धडाडली. नितीश कुमार रेड्डीने जॅक क्रॉलीला झेलबाद करत माघारी धाडलं. मोहम्मद सिराजने बेन डकेटला बाद केलं. त्यानंतर मोहम्मद सिराजने ओली पोपलाही बाद करत माघारी धाडलं. आकाशदीपने दुखापतग्रस्त असतानाही हॅरी ब्रुकची दांडी गुल केली. इंग्लंडचे टॉप ऑर्डरचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. त्यामुळे भारताचं अर्ध काम पूर्ण झालं होतं. उर्वरीत काम वॉशिंग्टन सुंदरने पूर्ण केलं.
वॉशिंग्टन सुंदरची ड्रीम स्पेल
वॉशिंग्टन सुंदरने या डावात गोलंदाजी करताना १२.१ षटकात अवघ्या २२ धावा खर्च करून ४ गडी बाद केले. सर्वात आधी त्याने इंग्लंडचा प्रमुख फलंदाज जो रूटला त्रिफळाचित करत इंग्लंडला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं. त्यानंतर जेमी स्मिथ, बेन स्टोक्सला देखील त्रिफळाचित केलं. शेवटी शोएब बशीर आणि जोफ्रा आर्चरची जोडी मैदानावर होती. सुंदरने बशीरलाही त्रिफळाचित केलं आणि इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांवर आटोपला.
भारतीय संघासमोर जिंकण्यासाठी १९३ धावांचं आव्हान
या सामन्यातील पहिल्या डावात दोन्ही फलंदाजांनी ३८७ धावा केल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ जितक्या धावा करणार, ते भारतीय संघासमोर सामना जिंकण्यासाठीचं आव्हान होतं. इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. तर बेन स्टोक्सने ३३, हॅरी ब्रुकने २३, जॅक क्रॉलीने २२ धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह- मोहम्मद सिराजने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर नितीश कुमार रेड्डी आणि आकाश दीपने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.