India vs England, Washington Sundar: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दोन्ही संघांचा पहिला डाव ३८७ धावांवर आटोपला. त्यामुळे दुसरा डाव पुन्हा एकदा शून्यापासून सुरू झाला आहे. दरम्यान चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला आहे. दरम्यान वॉशिंग्टन सुंदरने जेमी स्मिथला सुंदर चेंडू टाकून त्रिफळाचित करत माघारी धाडलं आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.
वॉशिंग्टन सुंदरचा जेव्हा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला गेला, त्यावेळी या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले गेले होते. कारण वेगवान गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या खेळपट्टीवर २ फिरकी गोलंदाजांना कशाला? कारण रवींद्र जडेजा आधीपासून प्लेइंग ११ मध्ये होता. पण वॉशिंग्टनने आपल्या कामगिरीने सर्वांची बोलती बंद केली. त्याने फलंदाजीत बहुमूल्य खेळी केली. त्यानंतर गोलंदाजी करताना आधी जो रूटला आणि नंतर तुफान फॉर्ममध्ये असलेल्या जेमी स्मिथला त्रिफळाचित करत माघारी धाडलं.
तर झाले असे की, भारतीय संघाकडून ४७ वे षटक टाकण्यासाठी वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीला आला. या षटकातील दुसरा चेंडू टप्पा पडून सरळ राहिला. पण जेमी स्मिथ टर्नसाठी खेळायला गेला. त्यामुळे चेंडू सरळ जाऊन यष्टीला लागला. या शानदार चेंडूमुळे जेमी स्मिथला ८ धावा करत माघारी परतावं लागलं. याआधी त्याने जो रूटलाही त्रिफळाचित करत माघारी धाडलं होतं. त्यामुळे आघाडीवर असलेला इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला.
या सामन्यातील पहिल्या डावात दोन्ही संघांचा डाव ३८७ धावांवर आटोपला आहे. अजूनही पूर्ण एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे. चौथ्या दिवशी इंग्लंडचा संघ भारतीय संघासमोर धावांचा डोंगर उभारण्याच्या प्रयत्नात असणार आहे. इंग्लंडने आतापर्यंत ७ गडी बाद १८१ धावा केल्या आहेत. एक वेळ अशी होती, जेव्हा इंग्लंडचा संघ ३०० धावांच्या पार जाईल असं वाटलं होतं.
पण भारतीय गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. इंग्लंडचा डाव संपुष्टात येण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे हा सामनाज जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.