यंदाच्या आयपीएल सत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या रायझिंग सुपरजाएंट्स पुणे RPS संघातील वॉशिंग्टन सुंदर या फिरकीपटू गोलंदाजाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. रविचंद्रन अश्विनच्या दुखापतीमुळे पुण्याच्या संघात संधी मिळालेल्या १७ वर्षीय वॉशिंग्टनने मुंबईविरुद्धच्या सामन्यात नावाप्रमाणे सुंदर कामगिरी केली. या सामन्यात ३ बळी मिळवून त्याने सामनावीराचा पुरस्कार मिळवला. तसेच पुण्याला पहिल्यांदा आयपीएलच्या सामन्यात प्रवेश मिळवण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. या सामन्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या नावाची चांगलीच चर्चा रंगताना दिसते आहे. त्यात तो भारतीय असून, वॉशिंग्टन नाव कसे असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
प्रत्येक नावात काही ना काही अर्थ दडलेला असतो. त्याप्रमाणे वॉशिंग्टनच्या नावात ही एक अर्थ आहे. एका मुलाखतीमध्ये त्याच्या वडिलांनी त्याचं नाव ठेवण्याची कहाणी उलगडली.

भारतीय असून इंग्रजी व्यक्तीप्रमाणे मुलाला दिलेल्या नावाबद्दल सुंदर म्हणाले की, मी हिंदू असून, आमचे कुटुंब अगदी साधे आहे. ट्रिप्लिकेनमध्ये (थिरुवल्लीकेनी) आमच्या शेजारी सैन्यातून निवृत्त झालेले गृहस्थ राहत होते. ते क्रिकेटचे मोठे चाहते होते. आम्ही क्रिकेट खेळताना ते मरिना मैदानावर पाहायला यायचे. पी.डी. वॉशिग्टन हे स्वत: क्रिकेटर होते, असेही त्यांनी सांगितले. आमच्या घरची परिस्थिती बेताची असताना या गृहस्थांनी मला युनिफॉर्म, शाळेची फी तसेच पुस्तके दिली. ते सायकलीवरुन मला मैदानावर घेऊन जायचे. त्यांनी मला प्रेरणा दिली. ते आमच्यासाठी खूप काही होते. माझ्या पहिल्या मुलाच्या जन्मापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे पहिल्या मुलाला मी त्यांचे नाव दिले. मी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे मुलाचे श्रीनिवासन असे नामकरण केले होते. मात्र, माझ्यासाठी खूप काही केलेल्या वॉशिंग्टन यांच्या स्मरणार्थ अधिकृतरित्या मी मुलाचे नाव वॉशिंग्टन ठेवले. माझ्या छोट्या मुलाला मी ज्युनिअर वॉशिंग्टन म्हणून बोलवतो, असेही त्यांनी सांगितले.