Wasim Akram Targets Indian Fans, Media: पाकिस्तानी माजी खेळाडू वसीम अक्रमने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामन्यापूर्वी भारताला विश्वचषक चॅम्पियन म्हणून घोषित केल्याबद्दल चाहते, सोशल मीडिया आणि मीडियाला दोष देत खडेबोल सुनावले आहेत. भारताने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी विक्रमी १० विजय नोंदवले. १९ नोव्हेंबरला भारत अंतिम सामन्यात विजयी होऊन आता विश्वचषकावर आपले नाव कोरणार यासाठीच भारतीय चाहते प्रतीक्षेत होते. पण कर्णधार पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीपासून ते विजयी शॉटपर्यंत प्रत्येक वेळी भारताला आश्चर्याचा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची इतकी कोंडी केली की ११ ते ४० षटकांदरम्यान भारतीय फलंदाजांना केवळ चार चौकार मारता आले.
फलंदाजीत न चमकल्या भारतीय संघाने गोलंदाजीची सुरवात मात्र चांगली केली होती. ऑस्ट्रेलियाला ४७/३ पर्यंत कमी आणले होते पण जसजसा सामना पुढे सरकत गेला तेव्हा खेळपट्टी फलंदाजीसाठी साजेशी होत गेली आणि त्याचा परिणाम सर्वांनीच पाहिला. भारताच्या या पराभवाचा दोष काही अंशी भारतीय चाहत्यांचा सुद्धा आहे असे म्हणत अक्रम यांनी चाहत्यांना सुद्धा माफी मागायला हवी असे म्हटले आहे.
वसीम अक्रम यांनी स्टार स्पोर्ट्सवरील चर्चेत म्हटले की, “मी समजू शकतो की एक देश म्हणून पराभवावर मात करणे कठीण जाईल कारण तुमचा संघ संपूर्ण स्पर्धेत खूप चांगला खेळला. त्यांनी १० सामने जिंकले, त्यात सातत्य होते. पण टेलिव्हिजन, सोशल मीडिया, चाहते… तुम्ही सगळ्यांनी आधीच भारताला विश्वचषक विजेता म्हणून घोषित करण्याची चूक केलीत हे मान्य करायला हवे. माफी मागायला हवी.
मीडियाने सुद्धा लोकांच्या अपेक्षा वाढवल्या. ही पूर्णपणे कोणा एकाची चूक नाही कारण संघ खरोखरच चांगला खेळत होता. हा फक्त एक वाईट दिवस होता. शिवाय मधल्या षटकांमध्ये गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ज्या प्रकारे त्यांच्या योजनांची अंमलबजावणी केली, त्याच योजना सामन्यात निर्णायक ठरल्या, त्यांनी सूर्यकुमार यादवला एकही वेगवान चेंडू टाकला नाही. फाइन-लेग आणि थर्डमॅन अक्षरशः कीपरच्या मागे होते. म्हणूनच ऑस्ट्रेलियालाचे कौतुक आहे.”
दरम्यान, १९९९ च्या विश्वचषक फायनलमधील पराभव पाकिस्तानी चाहते अद्याप विसरलेले नाहीत, असा खुलासाही अक्रम यांनी केला. “सर्वप्रथम, भारतीय संघ खरोखरच चांगला खेळला. अजूनही आम्हाला विश्वास बसत नाही की त्यांचा अंतिम टप्यात पराभव झाला. मला अजूनही १९९९ च्या विश्वचषक फायनलमधील पराभवाबद्दल विचारले जाते. चाहते हे कधी विसरतील? भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांची समरणशक्ती हत्तीसारखी आहे. आम्ही ती फायनल गमावून ३० वर्षे झाली आणि तरीही ते मला विचारतात की मी नाणेफेक जिंकून फलंदाजी का निवडली. त्यामुळे सोशल मीडियाला गांभीर्याने घेऊ नका, त्यात अर्ध्याहून जास्त नाटकच आहे”.
हे ही वाचा<< हार्दिक पंड्याने IPL च्या १० वर्षात केलेली कमाई वाचून व्हाल थक्क! कसा बदलला पंड्याचा पगार, पाहा तक्ता
अक्रम यांनी शेवटी “भारतीय संघालाच नव्हे तर चाहत्यांना सुद्धा आता एक राष्ट्र म्हणून, पुढे जायचे आहे, सहा महिन्यांत (जून २०२४) मध्ये आणखी एक विश्वचषक येत आहे त्यासाठी तुमच्या संघाला प्रोत्साहन द्या.” अशा शब्दात आवाहन केले आहे.