अॅडलेड कसोटीत मानहानीकारक पराभवासा सामोरं जावं लागल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दणक्यात पुनरागमन करत कांगारुंवर ८ गडी राखून मात केली आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत करत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेने दुसऱ्या डावातही ७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विजयी फटका लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर अनेक माजी खेळाडूंनी भारतीय संघावर टीका केली होती. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने टीम इंडिया कसोटी मालिकेत ४-० ने हरेल असं भाकीत वर्तवलं होतं. मेलबर्न कसोटी सामन्यातील विजयानंतर वासिम जाफरने वॉनला प्रत्युत्तर देत सेक्रेड गेम्स मधील मिम्सचा वापर करत त्याची खिल्ली उडवली आहे. पाहा काय म्हणतोय जाफर…
#INDvAUS #AUSvIND https://t.co/cpb0rUKMEF pic.twitter.com/QemqRrYuMJ
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) December 29, 2020
आणखी वाचा- भारताच्या विजयात बुमराह चमकला, अनिल कुंबळेच्या कामगिरीशी बरोबरी
दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात ७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल दुसऱ्या डावातही अवघ्या ५ धावा काढून मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या चेतेश्वर पुजारालाही आपली छाप पाडता आली नाही. ३ धावा काढून पुजारा कमिन्सच्या गोलंदजीवर माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या अजिंक्य रहाणेने काही सुरेख फटके लगावत भारतीय संघावरच दडपण कमी केलं. यानंतर शुबमन गिलनेही काही चांगली फटकेबाजी करत संघाला विजयाच्या समीप आणलं. अखेरीस रहाणे-गिल जोडीने अधिक पडझड न होऊ देता संघाच्या विजयावर मोहर उमटवली.