India vs South Africa Women’s World Cup 2025 Final Match: रविवारी झालेल्या महिला विश्वचषक अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला आणि विश्वचषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं. त्यामुळे टीम इंडियावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. सर्व आजी-माजी महिला व पुरूष खेळाडू टीम इंडियाचं, महिला संघातील खेळाडूंचं अभिनंदन करत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफरनं केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. त्याची ही पोस्ट व्हायरल होताच त्यावर नेटिझन्सच्या मोठ्या रंजक कमेंटही येऊ लागल्या आहेत.

काय म्हणाला वासिम जाफर?

वासिम जाफरने त्याच्या या पोस्टमध्ये महात्मा गांधीजींचा उल्लेख केला आहे. मात्र, यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासंदर्भात विनोदी उल्लेख केल्यामुळे त्यावर नेटिझन्सच्या तुफान प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एका संवादाच्या स्वरूपात वासिम जाफर याने ही पोस्ट केली आहे.

दक्षिण आफ्रिका: आम्ही काही ऑस्ट्रेलिया नाही आहोत. तुम्ही प्रत्येक अंतिम सामन्यात हा कसला सूड घेत असता?
भारत: महात्मा गांधीजींना ‘तेव्हा’ रेल्वेतून खाली उतरवल्याचा!

अशी पोस्ट वासिम जाफरनं केली आहे. त्यावर ट्रूथ बॉम्ब नावाच्या एका अकाऊंटवरून तशाच स्वरूपाच्या संवादाची एक कमेंट करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिका: आम्ही काही इंग्लंड नाही आहोत. तुम्ही प्रत्येक अंतिम सामन्यात इतके गंभीर का असता?
भारत: कारण आमचे हिरे पुन्हा गमावण्याची आमची इच्छा नाही!

अशी कमेंट या युजरनं केली आहे. तसेच, एका युजरनं ‘चीता की चाल, बाज की नजर और साऊथ अफ्रिका की चोकिंग स्किल्सपर कभी संदेह नहीं करते’, असा चित्रपटातील संवाद पोस्ट केला आहे.

एका युजरनं त्यावर २०२२ च्या सेमी फायनलची आठवण करून दिली आहे. ‘२०२२ साली आम्ही त्यांच्यामुळे सेमीफायनलमध्ये पोहोचू शकलो नाही, त्याचाच हा छोटासा बदला’, असं या कमेंटमध्ये म्हटलं आहे.

भारताचा ऐतिहासिक विजय

अंतिम सामन्यात भारतानं पहिली फलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २९८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या २४६ धावांत गारद झाला. कर्णधार लॉरा वोल्फार्टनं केलेल्या १०१ धावा वगळता आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. भारताकडून दीप्ती शर्मानं सर्वाधिक ५ बळी घेत अंतिम सामन्यातील संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याचबरोबर स्पर्धेत थेट सेमीफायनलमध्येच दाखल झालेल्या शफाली वर्मानंही सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत ७ षटकांमध्ये ३६ धावांच्या मोबदल्यात दोन महत्त्वाचे फलंदाज बाद केले.